भायखळय़ात बेस्ट बसच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

भायखळा येथे आज सकाळी बेस्टच्या ताफ्यातील एका कंत्राटी बेस्ट बसने वृद्ध महिलेला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचा चालक आणि वाहकाला भायखळा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

बेस्टने टाटा समूहाच्या मालकीच्या बस कंत्राटी तत्त्वावर भाडय़ाने घेतल्या आहेत. या बसपैकी एक बस बॅकबे डेपोतून शिवडीमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे जात होती. भायखळा येथे 86 वर्षीय अस्मा तय्यब बाली या महिला बसमधून खाली उतरल्या आणि रस्ता ओलांडू लागल्या. बससमोरूनच रस्ता ओलांडत असताना बस सुरू झाली आणि त्याची धडक त्यांना बसली. अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या खाली कोसळल्या. तिथे कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी महिलेला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, कुर्ल्याच्या घटनेनंतरही बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसने होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबले नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.