एकीकडे डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीमुळे अडचणीत आलेल्या ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांची संख्या 45 हजारांवरून निम्म्यावर आली असताना आज एकाच दिवशी तब्बल 556 कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर गेल्या महिन्यासह जुलै महिन्यात मिळून एकूण 933 कर्मचाऱयांची सेवा समाप्त होत आहे. यातच हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे तूर्तास तरी कोणत्याही नव्या भरतीचे नियोजन नसल्यामुळे ‘बेस्ट’ची सेवा कोलमडण्याचा धोका आहे.
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक स्थिती बिघडल्याने ‘बेस्ट’ला कारभार हाकताना नाकीनऊ येत आहेत. यातच आता एक हजारांवर कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा प्रचंड ताण येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मिळणाऱया सुविधांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने कर्मचाऱयांची रिक्त झालेली पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कामगार संघटनांनी केली.
अशी आहे कर्मचाऱयांची संख्या
विद्युत विभाग 4776
अभियांत्रिकी 4127
वाहतूक विभाग 16577
व्यवस्थापन विभाग 1444
एकूण कर्मचारी 26924
निवृत्त कर्मचाऱयांची 400 कोटींची देणी थकीत
– सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘बेस्ट’च्या विद्युत आणि परिवहन उपक्रमात काम करणाऱया कर्मचाऱयांची एकूण संख्या तब्बल 45 हजारांवर होती. मात्र सद्यस्थितीत ही संख्या आता 26 हजार 924 वर आली आहे.
– यातील सुमारे एक हजार कर्मचारी तीन महिन्यांत निवृत्त होत आहेत. असे असताना ‘बेस्ट’मधून सप्टेंबर 2022 पर्यंत निवृत्त झालेल्या दीड ते पावणे दोन हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱयांची तब्बल 400 कोटींची देणी ‘बेस्ट’ प्रशासनाकडे थकीत आहेत.
पालिकेने कोट्यवधी देऊनही देणी थकीत
सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते सन 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एवढय़ा रकमेचे अधिदान महापालिकेने ‘बेस्ट’ला केले आहे. मात्र तरीदेखील ‘बेस्ट’ प्रशासनाकडे निवृत्त कर्मचाऱयांचे तब्बल 400 कोटी थकीत असल्याने निवृत्त कर्मचाऱयांकडून संताप व्यक्त होत आहे.
निवृत्त कर्मचाऱयांची संख्या
– सप्टेंबर 2022 पर्यंत सुमारे दीड हजार
– आज 31 मे 2024 रोजी 556 निवृत्त
– मागील महिन्यात निवृत्त – 116
– जुलैमध्ये होणारे निवृत्त – 261
– ‘बेस्ट’ही मुंबईकरांच्या प्रवासाची दुसरी लाइफलाइन आहे. ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख प्रवासी प्रवास करतात. ‘बेस्ट’ कोलमडल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसेल.