सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सामान्यांची फसवणूक करण्यासाठी चोरटे नवनवी शक्कल लढवत असतात. आता बंगळुरुमध्ये सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आले.बंगळुरुच्या एका व्यक्तीला बँक कर्मचारी बनून त्याच्या बँक खात्यातून 2.80 कोटी रुपये चोरण्यात आले आहेत. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसात धाव घेत फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.
बंगळुरुच्या एका व्यक्तीला 27 नोव्हेंबर 2024 रोजी व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर फसवणूक सुरू झाली. त्यानंतर बॅंकेचे कर्मचारी असल्याचे भासवून त्याला पार्सलद्वारे स्मार्टफोन पाठवण्यात आला होता. सायबर चोरट्याने व्यक्तीला त्याच्या पेइंग क्रेडिट कार्ड अर्जाच्या मंजुरीसाठी फोन केल्याचे सांगितले. यानंतर पीडित व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी मंजूरी दाखवत बनावट प्रक्रिया सांगितली. त्यात पीडित व्यक्तीला नवीन सिमकार्ड घेण्यास सांगितले. त्यानंतर पार्सलद्वारे त्याला स्मार्टफोन पाठवण्यात आला. हे पार्सल सिटी बँकेचे नाव वापरून पाठवण्यात आले आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सायबर चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला.
यानंतर त्या व्यक्तीला त्या फोनमध्ये सिमकार्ड टाकण्यास सांगण्यात आले. पाठवलेल्या मोबाईलमध्ये काही ॲप्स देखील असू शकतात, जे मोबाइल हॅकिंग आणि बेकायदेशीर डेटा ट्रान्सफरमध्ये मदत करतात याचीही त्या व्यक्तीला कल्पना नव्हती. यानंतर पीडीत व्यक्तीने मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकताच त्या फोनमध्ये आधीच असलेले धोकादायक ॲप काम करू लागले. सायबर चोरट्यांनी काही ॲपच्या मदतीने गुप्तपणे त्या व्यक्तीचा बँक तपशील आणि ओटीपी इत्यादींचा ॲक्सेस घेतला. यानंतर पीडितेच्या बँक खात्यातील पैसे, इतर बचत आणि एफडी आदींची चोरी करून एकूण 2.80 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
सायबर चोरट्यांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे. मोबाईलमध्ये छेडछाड करून त्यावर धोकादायक ॲप्स इन्स्टॉल करतात. यानंतर पीडीत व्यक्तिकडे हा टेम्पर्ड हँडसेट पाठवला जातो आणि त्याला सिमकार्ड टाकण्यास सांगितले जाते. पीडित व्यक्तिने त्याचे सिम कार्ड टाकले, तर सायबर चोरटे गुप्तपणे बँकेचे तपशील आणि ओटीपी इत्यादी अॅक्सेस करतात आणि नंतर बँक खात्यातून पैसे काढतात. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कळले की तो सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. यानंतर त्याने बँक आणि पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.