घरात शेर होण्यासाठी बंगळुरू सज्ज, बंगळुरूला घरच्या मैदानावर पहिल्या विजयाची प्रतीक्षा; राजस्थानपुढे विजयाच्या वाटेवर परतण्याचे आव्हान

घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिक पाहिलेल्या बंगळुरूने बाहेरच्या मैदानांवर लागोपाठ पाच विजय मिळवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱया स्थानी झेप घेतलीय. बाहेरच्या मैदानावर शेर ठरलेला हा संघ आपल्या होम ग्राऊंडवर मात्र ढेर झालाय. उद्या गुरुवारी घरच्या मैदानावर शेर होण्यासाठी बंगळुरू सज्ज झालाय. पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपवण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सलाही विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी आपल्या गोलंदाजीची धार वाढवावी लागणार आहे.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू-राजस्थान यांच्यात लढत रंगणार आहे. बंगळुरूने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर तीन सामने खेळले असून त्यांना विजयाचे खाते उघडता आलेले नाही, मात्र बंगळुरूच्या बाहेर मात्र या संघाने लागोपाठ विजयाला गवसणी घातली आहे. घरच्या मैदानावर बंगळुरूची ना फलंदाजी चालत आहे, ना गोलंदाजी. त्यामुळे होम ग्राऊंडवर बुचकळय़ात न पडता सांभाळून खेळायचे की आक्रमण करायचे ही रणनीती आखूनच बंगळुरूला मैदानावर उतरावे लागणार आहे. बाहेरच्या मैदानावर 9-10 च्या सरासरीने धावा फटकाविणाऱया बंगळुरूने घरच्या मैदानावर केवळ 7-8 च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. बंगळुरूचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल हंगामात 64 च्या सरासरीने धावांची लयलूट केलीय.

राजस्थानला गोलंदाजी सुधारण्याची गरज

कर्णधार संजू सॅमसन जायबंदी झाल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या अडचणीत आहे. त्याच्या गैरहजेरीत रियान पराग या संघाची धुरा सांभाळतोय. गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेल्या राजस्थानला आठ लढतींत केवळ दोन विजय मिळविता आले आहेत. यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिमरोन हॅटमायर व नितीश राणा हे फलंदाज फॉर्मात आहेत, ही राजस्थानसाठी दिलासा देणारी बाब होय, मात्र या संघातील गोलंदाजांनी साफ निराशा केलीय. या संघाकडून वानिंदू हसरंगाने सहा लढतीत सर्वाधिक 9 फलंदाज बाद केले आहेत. जोफ्रा आर्चर (आठ सामने; 8 विकेट), महेश थिक्षिणा (आठ सामने 7 विकेट) यांना संघाच्या विजयात वाटा उचलण्यासाठी बंगळुरूच्या फलंदाजीला लगाम घालावा लागणार आहे.