पश्चिम बंगालमध्ये वाढल्या सामूहिक हिंसाचाराच्या घटना, एका आठवड्यात 12 प्रकरणे आली समोर

पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्याभरात सामूहिक हिंसाचाराच्या 12 घटना घडल्या आहेत. नुकताच चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला एका गटाने मारहाण केली, त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुतेक घटना या लहान मुलांच्या चोरीच्या संशयावरून घडल्या आहेत.

झारग्राम जिल्ह्यातील जांबोनी परिसरात 22 जून रोजी सौरव शॉ आणि त्याचा मित्र या दोन तरुणांना जमावाने चोरीच्या संशयावरून मारहाण केली होती. सौरवचा नऊ दिवस रुग्णालयात उपचारानंतर मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राची प्रकृती गंभीर आहे.

स्थानिक वृत्तानुसार, सौरव व त्याचा मित्र त्याच्या आईच्या स्कूटीवरून जात असताना ही घटना घडली. एका बांधकाम साइटजवळ उभ्या असलेल्या कारमधून एका वस्तूची चोरी झाली. त्यावेळी या दोघांची दखल घेत जमावाने त्यांना लक्ष्य केले आणि हल्ला केला, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यावेळी, पोलिसांना माहिती मिळताच हस्तक्षेप करत जखमी तरुणांची सुटका करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान सौरवचा मृत्यू झाला.

घटनेच्या सहा दिवसांनंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार प्राप्त झाली. महेंद्र मित्तल आणि दाक्टर सोरेन या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती झारग्रामचे एसपी अरिजीत सिन्हा यांनी एका वृत्तपत्राला दिली.

उत्तर दिमापूर घटनेचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर टीका करणारी पोस्ट केली आहे.

एका आठवड्यात सामूहिक हिंसाचाराच्या 12 घटना

1. हुगळी जिल्ह्यात 30 जून रोजी आशिष बाऊल दास या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. दुचाकीचा अपघात झाल्यानंतर काही मद्यधुंद लोकांनी आशिष बाऊल दास यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी त्याला वाचवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
2. कोलकात्याच्या सॉल्ट लेक परिसरात मोबाइल चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. प्रसेनजीत मोंडल असे तरुणाचे नाव आहे. तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकासह तिघांना अटक केली आहे.
3. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते तजमुल हक याने एका जोडप्याला मारहाण केली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पुरुष या जोडप्याला बांबूच्या काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल नेत्याला अटक करण्यात आली.
4. मोबाइल चोर असल्याच्या संशयावरून कोलकाता येथे एका टीव्ही मेकॅनिकची विद्यार्थ्यांच्या गटाने बेदम मारहाण केली. बोबाजार परिसरातील उदयन वसतिगृहात मोबाइल चोरीची घटना घडली होती. इसम हा वसतिगृहाभोवती फिरताना दिसला, तेव्हा विद्यार्थ्यांना त्याचा संशय आला. नंतर विद्यार्थ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून इसमाला रुग्णालयात दाखल केले, परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 14 विद्यार्थ्यांना अटक केली.
5. पश्चिम बंगालच्या विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला की, भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या एका महिला कार्यकर्त्याला कूचबिहारमध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी एक किलोमीटरपर्यंत खेचत नेत मारहाण केली. याप्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.
6. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात सामूहिक हिंसाचाराच्या किमान सहा घटना नोंदवल्या आहेत. या सर्व घटना मुलांची चोरी या संशयावरून घडल्या. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात लहान मुलांची चोरी झाल्याची अफवा पसरली होती. बरासत, गोपाळनगर, गायघाटा, बोनगाव, बराकपूर, अशोकनगर या भागात जमावाने हल्ले केले आहेत.