BSF च्या महिला कॉन्स्टेबलचा पराक्रम; समयसूचकता दाखवत केला गोळीबार, घुसखोरांचा डाव उधळला

एका महिला बीएसएफ कॉन्स्टेबलने धैर्याने स्वतःचा बचाव करत पश्चिम बंगालमधील 68 व्या बटालियनच्या रंगाघाट सीमा चौकीवर बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना मागे हटवल्याचं वृत्त आहे.

30 जुलै रोजी, तिच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या ड्युटी दरम्यान, बीएसएफ कॉन्स्टेबलने चाकू आणि तलवारीसह सशस्त्र 13 ते 14 घुसखोर बांगलादेशातून आंतरराष्ट्रीय सीमा (IB) ओलांडून हिंदुस्थानात येण्याचा प्रयत्न करताना पाहिले.

घुसखोर पुढे येत असताना, दक्ष महिला कॉन्स्टेबल त्यांच्या दिशेनं धावली आणि लांबून तिनं परत जाण्याचा तोंडी इशारा दिला.

घुसखोरांनी हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून तिला घेरलं आणि हल्ला केला. त्याचवेळी तिचा सहकारी जवान आला आणि घुसखोरांना पळून लावण्यासाठी एक ग्रेनेड फेकला. मात्र घुसखोर काही हटले नाहीत.

या क्षणी, महिला कॉन्स्टेबलने हल्लेखोरांवर एक राऊंड गोळीबार केला या गोळीबारानंतर घाबरलेल्या घुसखोरांनी पुन्हा बांगलादेशात धाव घेतली. घटनास्थळावरून सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी घुसखोरांची पुष्टी झाली आहे.

हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर गेल्या 3 दिवसात हल्ल्याची ही सलग तिसरी घटना आहे.

बीएसएफच्या म्हणण्यानुसार, ही घटना बांगलादेशी घुसखोरीचं स्पष्ट उदाहरण आहे. विशेषतः गुरेढोरे तस्करांकडून बीएसएफ जवानांवर हल्ले करण्याचे प्रयत्न होतात त्याचेच हे उदाहरण आहे.

या घटनांनंतर, बीएसएफने बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) कडे सातत्याने तीव्र निषेध नोंदविला आणि स्थानिक पोलिसांना प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

असंख्य ध्वज बैठका घेऊनही, BGB कडून ठोस कारवाई दिसत नाही, ज्यामुळे घुसखोरांना आणखी बळ मिळते, असं सांगण्यात येत आहे.