
स्त्री असो किंवा पुरुष साधारणतः 35 वयानंतर आपल्या चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊ लागतो. ग्लो कमी झाल्यावर चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशावेळी अनेकदा न्यूनगंड निर्माण होताे आणि आपण आपल्याला कमी लेखायला लागतो. परंतु असे न करता, आपण घरच्याघरी काही सोपे उपाय वयाच्या तिशीनंतर सुरु केले तर, आपल्याला नंतर सौंदर्याची काळजी करावी लागणार नाही.
घरच्या घरी सुंदर दिसण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी आपल्याला फळांमधील पपईचा वापर करता येईल. पपईचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. पपईमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पपई केवळ स्वस्तच नाही तर सहज उपलब्ध देखील असते.
कसा कराल पपईचा फेस पॅक
साहित्य: अर्धी वाटी पिकलेली पपई, एका अंड्याचा पांढरा भाग
कृती– पपईचे छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यानंतर ते एका भांड्यात घेऊन नीट मॅश करुन घ्यावे. अंड्याचा पांढरा भाग फेटून घ्यावा.त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करावे. सर्व मिश्रण नीट एकजीव करुन चांगली पेस्ट तयार करावी.
फेसपॅक कसा लावावा? – हा फेसपॅक लावताना कोणत्याही ब्रशचा वापर न करता चेहऱ्यावर बोटांनी लावावा. फेस पॅक चेहऱ्याला लावून झाल्यानंतर मान, नाक, कपाळ यावर हळुवार हाताने मालिश करा. किमान २० ते २५ मिनिटे हा फेसपॅक सुकू द्यावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावल्यास चेहरा चमकेल आणि तरुणही दिसेल.
या फेसपॅकचे फायदे?
पपईमध्ये असलेले एन्झाईम्स त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि त्यातील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करतात. अंड्याच्या पांढऱ्या भागाचा उपयोग या फेसपॅकमध्ये होत असल्याने, त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)