
चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. म्हणूनच चेहऱ्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपचार करतो. खासकरून एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होण्यासाठी, आपण पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर प्रयोग करत असतो. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण घरीसुद्धा अनेक प्रयोग करु शकतो. यातलाच एक प्रकार म्हणजे होममेड फेशियल. फेशियल केल्याने चेहऱ्यावरील घाण आणि मृत त्वचा निघून जाते आणि त्वचाही उजळते. तसेच, फेशियल केल्याने पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि त्वचेचा रंगही सुधारतो. मलई आपल्या त्वचेला बराच काळ मॉइश्चरायझ आणि हायड्रेट ठेवते. याव्यतिरिक्त क्रीममध्ये आढळणारे लॅक्टिक अॅसिड त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करते.
घरी मलई फेशियल कसे करावे?
कोणत्याही फेशियलची पहिली पायरी म्हणजे क्लिंजिंग. क्लिंजिंगमुळे त्वचेवर साचलेली धूळ आणि घाण निघून जाते. तसेच रंगही सुधारतो, याकरता दोन चमचे मलई घेऊन त्यात चिमूटभर हळद घाला आणि चांगले मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार पद्धतीने मालिश करा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे मलई घ्या. त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घाला. या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
फेशियलच्या तिसऱ्या टप्प्यात, आपल्याला चेहऱ्याला मसाज करावा लागेल. यासाठी एका भांड्यात 2 चमचे मलई घ्या. त्यात गुलाबजलचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. आता त्यावरून 5 मिनिटे गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर मसाज करा. मलईने चेहऱ्याला मसाज केल्याने, त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर चमक वाढते. क्रीममध्ये असलेले पोषक तत्व रक्ताभिसरण वाढवतात आणि त्वचेला हायड्रेशन देतात.
फेशियलचा शेवटचा टप्पा म्हणजे फेस पॅक लावणे. मलईचा फेस मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात 2 चमचे मलई घ्यावी. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालावा. नंतर हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा. 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)