
असं म्हणतात की, दिवसाची सुरुवात उत्तम तर, पुढचा पूर्ण दिवस उत्तम जातो. म्हणूनच दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपण डिटाॅक्स वाॅटर हे प्यायलाच हवे. डिटाॅक्स वाॅटर पिण्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. हे पाणी पिण्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहता येते. डिटाॅक्स वाॅटर पिण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा वजन कमी करण्यासाठी होतो. त्यामुळेच डिटाॅक्स वाॅटर पिण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्वचा सुंदर ठेवण्यासाठी डिटाॅक्स वाॅटर हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. डिटाॅक्स वाॅटर आपल्या धावत्या जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचे आहे. किमान सकाळी एक ग्लास हे पाणी पिल्यामुळे आपला दिवसाचा सारा ताण कमी होतो.
डिटाॅक्स वाॅटर बनवण्याची कृती
साहित्य
काकडी – पाच ते सात काप
लिंबू – अर्धा
पुदीना – सात ते आठ पाने
पाणी – 1 वाटी
पद्धत
काकडीचे काही तुकडे काचेच्या भांड्यात ठेवा. नंतर त्यात लिंबाचे तुकडे घालावे. त्यानंतर पुदिन्याची पाने टाका आणि थोडा लिंबाचा रस घाला. नंतर पाणी घाला. चांगले मिसळून हे मिश्रण फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवावे. काही वेळाने पाणी थोडे थंड झाल्यावर दिवसभरात तुम्हाला हवे तसे हे पाणी पिऊ शकता.
लिंबू एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे आणि चयापचय सुधारण्यास मदत करते तसेच विषारी पदार्थ बाहेर टाकून शरीर शुद्ध करण्यास मदत करते.
लिंबू तुमचे रक्त शुद्ध करण्यासाठी देखील ओळखले जाते, त्यामुळे तुमचे शरीर अनेक आरोग्य विकारांपासून मुक्त होते.
पुदिना पचनासाठी चांगला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु हे केवळ पचन आणि वजन कमी करण्यास मदत करत नाही तर शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकते.
तुम्ही सोडा किंवा साखरयुक्त पेयांसाठी आरोग्यदायी पर्याय शोधत असाल, तर पुदिन्याचे पाणी हा एक उत्तम उपाय आहे. त्यात साखर आणि कॅफीन नसतात आणि खूप कमी कॅलरीज असतात.
काकडीत 96% पाणी असते आणि त्यामुळे अतिरिक्त हायड्रेशन मिळते. तसेच, काकडी विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि तुमचे आतडे स्वच्छ करते, त्यामुळे पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या टळतात.
काकडीमध्ये निरोगी पाचक एन्झाईम असतात, जे पचनास मदत करतात. खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध, हे पाणी ज्या महिलांना साधे पाणी पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे.
(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)