Curry leaves- पदार्थांची चव वाढविण्यासाठी तसेच डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी, कडीपत्ता आहे खूप गरजेचा!

कडीपत्ता आपल्या भारतीयांच्या जेवणातील एक अविभाज्य भाग. खासकरून फोडणीसाठी आपण कडीपत्त्याचा उपयोग  करतो. परंतु कडीपत्त्याचे पानातील स्थान मात्र नगण्य आहे. पानात कडीपत्ता वाढला की, तो आपण सर्वात आधी बाहेर काढून टाकतो. कडीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतो. कडीपत्त्याविषयी आपण नीट माहिती मिळवली तरच, कडीपत्त्याचे आपल्या आहारातील महत्त्व समजेल.

 

होय, कडीपत्ता आरोग्यासाठी तसेच अन्नाची चव वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कडीपत्ता नसल्याखेरीज दक्षिण भारतीय अन्न अपूर्ण आहे असे म्हणतात. कडीपत्त्यात लोह, झिंक, तांबे, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. कडीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे ‘ए’ आणि ‘बी’ हे उत्तम आरोग्य राखण्यास मदत करते.

नियमितपणे कडीपत्त्याचा रस सेवन केल्यास आपण बर्‍याच गंभीर आजारांना टाळू शकताे. यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होते आणि वजनही कमी होते.

 

कडीपत्त्याचा आहारात समावेश नियमितपणे केल्यास डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते. कडीपत्त्याचा रस करण्यासाठी सर्वप्रथम, पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने धुवून स्वच्छ करा. त्यांना मिक्सरमध्ये घाला आणि दोन चमचे पाणी घालून एकत्र वाटून घ्या. पेस्टसारखे झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी घालून पुन्हा वाटून घ्या. एका ग्लासमध्ये चहाच्या गाळणाने गाळून घ्या व त्याचे सेवन करा. कडीपत्ता रसाचे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे फायदे आहेत.

 

नियमितपणे कढीपत्त्याचा रस सेवन केल्यास अशक्तपणाची समस्या दूर होते. कारण त्यात भरपूर लोह आणि फॉलिक असिड असते. या पानांचा रस सेवन केल्याने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातून जादा चरबी काढून टाकण्यास हा रस खूप उपयुक्त आहे. ज्यांना ज्यूस पिण्यास आवडत नाही, ते खाण्यामध्ये या पानांचा वापर करू शकतात. यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्या आपल्या जवळपासही फिरकत नाही.

 

कडीपत्त्याचा रस सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. यासह, पोटात गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)