उन्हाळ्यात बीट खाण्यामुळे चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, वाचा बीट खाण्याचे फायदे

बीटमध्ये लोह,आणि फॅालिक एसिड असते त्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.रक्त वाढीसाठी दररोज एक कप बीटाचा रस घ्यावा.

उन्हाळ्यातील आहार हा एक महत्त्वाचा विषय आहे. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची गरज भरून काढण्यासाठी, आहारात विविध फळे तसेच ठराविक भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या कोशींबीरी उन्हाळ्यात खाण्याचा सल्ला हा डाॅक्टरांकडूनही दिला जातो. उन्हाळ्यामध्ये आहारात कोशींबीरीचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच उन्हाळ्यात गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, काकडी यासारख्या भाज्यांना अधिक महत्त्व येते. उन्हाळ्यात बीटचा वापर आहारामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचा सल्ला म्हणून दिला जातो. उन्हाळ्यात बीट खाण्यामुळे काय फायदे होतात हे आपण बघूया.

रक्ताची कमतरता असलेल्यांसाठी बीट खाणं हे वरदान मानले जाते. बीटामध्ये आयरनची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच रक्ताची कमतरता असलेल्यांना डाॅक्टरच बीट खा किंवा बीटाचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

बीटाचे सेवन हे पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उत्तम मानले जाते. भरपूर प्रमाणात बीटामध्ये फायबरचे गुणधर्म असल्यामुळे, पोटांच्या तक्रारीवर बीट खूप गुणकारी आहे. अपचनाच्या समस्येसाठी बीट सलाड खाण्याचा सल्ला म्हणून दिला जातो.

उन्हाळ्यात चेहरा काळवंडतो अशावेळी बीटाचा उपयोग करता येतो. बीट फेस मास्क हा चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. आयरनचे प्रमाण जास्त असल्यामुळे, चेहऱ्यावर उजळपणा येण्यास मदत होते.

वाढत्या वयामध्ये बीट खाणे गरजेचे आहे. कारण यामुळे मेंदुचे आरोग्य सुधारले जाते, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. बीटरुटचा रस रोज प्यायला असता ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, अशांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळेच हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

बीट आपला रोजचा स्टॅमिना वाढविण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे कार्य करते. बीटमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याकारणाने, शरीर ताजेतवाने राहते. म्हणूनच खेळाच्या आधी खेळाडू देखील बीटाचा रस घेताना आढळतात.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)