श्रीमंतांची चांदी, मात्र सर्वसामान्य, गरीब, विद्यार्थी, शेतकरी वाऱ्यावर; डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका

देशाच्या आर्थिक विकासाच्या टिमक्या मिरवत अर्थसंकल्पात विविध योजना आणल्याचा गाजावाजा केला जात असला तरी ‘श्रीमंतांची चांदी, मात्र गोरगरीब, शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प असल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. अर्थसंकल्पात सोने, मोबाईल स्वस्त, प्लॅटिनमसारख्या अतिमौल्यवान वस्तूंवर आयात कमी करणे अशा निर्णयांमुळे श्रीमंतांची चांदी होणार आहे. मात्र गरीब आणखी गरीब राहणार आहे. आर्थिक विकासाचे फायदे श्रीमंतांनी घ्यायचे आणि त्याची किंमत मात्र गरीबांनी मोजायची अशी पेंद्राची नीती कायम असल्याचे सांगत डॉ. मुणगेकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.

देशातील प्रचंड आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब होताना दिसत आहे. हिंदुस्थानात गेल्या काही काळात आर्थिक विषमता वाढत असल्याचे मुणगेकर म्हणाले. आज जगात सर्वाधिक आर्थिक विषमता असलेला देश म्हणून हिंदुस्थानची ओळख निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी दूरगामी योजनांची अंमलबजावणी होणे अनिवार्य आहे. मात्र सरकारकडून तसे होताना दिसत नाही. सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसाठी 1 कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेताना अतिगरीब, कामगार, दारिद्रय़ रेषेखालील लाकांसाठीदेखील घरांचा विचार होणे गरजेचे होते. मात्र असा विचार अर्थसंकल्पात झालेला दिसत नाही, असेही मुणगेकर म्हणाले. बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत. अर्थसंकल्पात नवीन काहीच नसून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही ते म्हणाले.