
किरकोळ वादातून भिक्षेकरूची हत्या झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. बाबू मेहतर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मुन्ना गुप्ताला जुहू पोलिसांनी अटक केली.
बाबू आणि मुन्ना हे दोघे भिक्षेकरू असून ते दोघे एकमेकांना परिचित आहेत. दिवसभर भिक्षा मागून ते दोघे रात्री फुटपाथवर झोपत असायचे. बाबू हा मुन्नाला नेहमी त्रास देत असायचा. त्याला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याचा राग मुन्नाच्या डोक्यात होता. रविवारी रात्री दहा वाजता किरकोळ वादातून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात मुन्नाने बाबूला लाकडाने मारहाण केली. त्या मारहाणीत बाबू हा जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच जुहू पोलीस घटनास्थळी आले. जखमी बाबूला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुन्नाविरोधात जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.