पुणे जिल्ह्यात पडताळणी आधी फक्त पाच लाडक्या बहिणींनी लाभ सोडला

लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन नसलेल्या बहिणींना योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले. तथापि, पुणे जिल्ह्यात पडताळणी आधी फक्त पाच लाडक्या बहिणींनी लाभ परत करून मिळालेली रक्कम महिला व बाल कल्याण विभागाकडे परत केली.

लाडक्या बहिणींनी दरमहा 1500 दिले जात आहेत, आता अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याने लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. कारवाई करण्याच्या आधी सरकारने निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी पुणे जिल्ह्यातून पाच बहिणी पुढे आल्या. माझ्याकडून नजरचुकीने हा अर्ज केला गेला, मला आता या योजनेचा लाभ नको आहे, अशी कारणे देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे.

अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या बहिणींना शिक्षा होणार या चर्चेमुळे त्यांच्यात महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी निकषात न बसलेल्या महिलांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर पहिल्याच दिवशी एक महिला ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या महिलेने सरकारने आवाहन केल्यानंतर आपल्याला ‘आता या लाभाची गरज नाही,’ असे लेखी देऊन चार महिलांनी लाभ सोडला. जिल्ह्यामध्ये सुमारे वीस लाख लाडक्या बहिणी असून अपात्रेच्या मुद्द्यावर त्यापैकी अवघ्या पाचच महिला पुढे आल्यामुळे नक्की संख्या किती आहे किंवा कसे याबद्दल स्पष्टता आलेली नाही.

कारवाई होणार नाही तरीही…

■ अपात्र असूनही लाडक्या बहिणीने लाभ घेतला आणि तो पुन्हा परत केला, म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यामध्ये चारचाकी गाडी तसेच अन्य निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी असल्याची चर्चा आहे. परंतु, प्रत्यक्षात लाभ परत करण्यासंदर्भात पुढे येणाऱ्या लाडक्या बहिणींचे प्रमाण अत्यल्प असल्याची चर्चा आहे.