दहावी परीक्षेच्या तोंडावर माझा भारत पदयात्रेचे फर्मान, दोन दिवसांपूर्वी धडकलेल्या आदेशाने शाळांची तारांबळ

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघे दोन दिवस असताना शाळांमध्ये माझा भारत पदयात्रेचे फर्मान राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या आदेशावरून काढले आहे. केंद्राकडून वारंवार येणाऱ्या उपक्रमांच्या फतव्यांना तोंड द्यायला एव्हाना शाळा सरसावल्या असल्या तरी यावेळी दहावीच्या परीक्षेच्या तोंडावरच हे आदेश आल्याने शाळांची तारांबळ उडणार आहे.

बुधवारी राज्यातील शाळांना शिवजयंतीची सुट्टी आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने सध्या मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग परीक्षेच्या तयारीत गुंतलेले आहेत. त्यामुळे सुट्टी असली तरी शाळांमध्ये परीक्षेचे काम सुरू आहे. त्यातच 18 फेब्रुवारीला शाळेत येऊन धडकलेल्या या पत्रामुळे मुख्याध्यापकांसमोर परीक्षेचे काम करू की पदयात्रा काढू, असा प्रश्न उभा राहिला आहे.

केंद्र सरकारने 7 फेब्रुवारीला यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला पाठवले होते. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश शाळांना 18 फेब्रुवारीला मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करताना शिक्षकांची तारांबळ उडाली.

शाळांनी आता फक्त सरकारी उपक्रमच घ्यावेत

सरकारच्या पातळीवरून इतक्या उपक्रमांचे आदेश सतत येऊन धडकत असतात की, शाळांना आपले उपक्रम घेणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे आता शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विकासाचे गरजा ओळखून तयार केलेले उपक्रम आयोजिणे बंद करावे, अशी हताश प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली.

पंतप्रधानांचा संदेश ऐकवण्याची सक्ती

एकूण तीन राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांत माझा भारत पदयात्रा काढण्यात येणार आहेत. त्यापैकी एका पदयात्रेचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने करण्याची योजना आहे. त्यासाठी विद्यार्थी-शिक्षकांना सकाळी 7.30 वाजता पंतप्रधानांचा उद्घाटनपर संदेश आभासी प्रणालीद्वारे ऐकविण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर 8 ते 10 या वेळेत सहा किलोमीटरची पदयात्रा काढण्याचे शाळांना काढावी लागेल. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीनवाशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणावर मार्गक्रमण करेल, याची दक्षता शाळांना घ्यावयास सांगण्यात आले आहे. तसेच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे या उपक्रमाचा अहवाल शाळांनी सरकारला पाठवायचा आहे.