22 लाख 32 हजार किमतीचा बिअर साठा जप्त; टँकरमधून गोवा बनावटीच्या बिअरची तस्करी

सिनेस्टाईल दारूची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडली. चार पंपार्टमेंट असलेल्या टँकरमधून लपूनछपून गोवा बनावटीच्या बिअरची तस्करी केली जात होती. कणकवली तालुक्यातील वारगाव येथे तो टँकर पकडून तब्बल 22 लाख 32 हजार रुपये किमतीचा बिअरचा साठा जप्त करण्यात आला.

मुंबई-गोवा राज्य महामार्ग क्रमांक 66 वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी वारगाव येथे आलेला दहा चाकी व चार पंपार्टमेंट असलेला टँकर अडवला. टँकरची पथकाने तपासणी केली असता त्या प्रत्येक पंपार्टमेंटमध्ये बिअरचे बॉक्स ठेवलेले आढळून आले. पथकाने त्या टँकरमधून गोवा बनावटीचे टुबर्ग स्ट्राँग बिअरचे 500 मिली क्षमतेचे 300 बॉक्स, गोवा बनावटीचे किंगफिशर अल्ट्रा स्ट्राँग बिअरचे 500 मिलीचे 150 बॉक्स असे एकूण 450 बिअरचे बॉक्स जप्त केले. पथकाने टँकर व चालकाचा मोबाईलदेखील जप्त केला आहे. चालक प्रभू लाल (32) याला पकडण्यात आले असून तो मूळचा राजस्थानचा आहे. याप्रकरणी पथक अधिक तपास करीत आहेत.