
राजेश चुरी, मुंबई
देशी बनावटीचे विदेशी मद्य आणि बीअरवरील कर वाढवून राज्य सरकारचे एकीकडे महसूल वाढीचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे बीअरवरील उत्पादन शुल्क कमी करण्याबरोबरच काही सवलतींसाठी बीअर कंपन्यांनी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. बीअरप्रेमींनी मागील दहा वर्षांत तब्बल तीस लाख लिटर बीअर रिचवली, पण तरीही एका दशकात बीअरच्या विक्रीत एक टक्काच वाढ झाली आहे. त्यामुळे बीअर कंपन्यांच्या तोंडाला फेस आला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प येत्या 10 मार्च रोजी विधिमंडळात सादर होणार आहे. सध्या वित्त व नियोजन विभागाचे अधिकारी बजेटची आखणी करण्यात गर्क आहेत. बजेटच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांतून राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने आखणी सुरू आहेत. त्यात सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या उत्पादन शुल्क विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने देशी बनावटीच्या विदेशी मद्यावर आणि बीअरच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आघाडीच्या बीअर कंपन्यांनी सरकारकडे निवेदन देत बीअर उत्पादकांना दिलासा देण्याची विनंती केली आहे. बीअर आणि देशी बनावटीचे विदेशी मद्य किती रिचवले आणि विक्रीत किती वाढ झाली याची मागील दहा वर्षांची आकडेवारीच सादर केली आहे. बीअरवरील उत्पादन शुल्क 235 टक्के आहे तर बीअरचे 2017 मध्ये वाढवले होते. त्यानंतर दर वाढलेले नाहीत याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
व्होडका-व्हिस्कीपेक्षा बीअरची विक्री अधिक
मागील दहा वर्षांत देशी बनावटीच्या विदेशी मद्याची 21 लाख 641.61 लाख लिटर्सची तर याच काळात बीअरची 29 लाख 422.37 लाख लिटर्सची विक्री झाली, पण बीअरच्या विक्रीत एक टक्का तर देशी बनावटीच्या विक्रीत सहा टक्के वाढ झाल्याची आकडेवारी आहे.
पाच वर्षांतील बीअरची विक्री
वर्ष विक्री (लिटर)
2019 ते 2020 2902.53
2020 ते 2021 2021.93
2021 ते 2022 2312.81
2022 ते 2023 3239.42
2023 ते 2024 3566.05