विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात परळी मतदारसंघात शिमगा पाहण्यास मिळाला. मतदारांना धमकावण्यात आले. बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मतदान केंद्रावर मारहाण करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी या गंभीर घटना घडल्या. त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे जाऊन धडकले. या घटनांची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या गंभीर घटनांमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याचा परिणाम मतदानावर होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. तसेच एक मतदारसंघातील विडा येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि नेकनूरजवळ असलेल्या आनंदवाडीत एका केंद्रप्रमुखाला मारहाण करण्यात आली तर आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गावात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेबूब शेख कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
विडय़ात दोन गटांमध्ये तुफान राडा
मतदान प्रक्रिया सुरू असताना केज मतदारसंघातील विडा येथे दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. या राडय़ाने संपूर्ण गावामध्ये दहशत निर्माण झाली. तातडीने पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण घटनेवर ताबा मिळवला आणि मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे आज बुधवारी दुपारी हृदयविकाराच्य तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले बाळासाहेब शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला होता. संदीप क्षीरसागरांच्या विजयासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते. आज मतदानाच्या दिवशी दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच संदीप क्षीरसागर यांनी रुग्णालय गाठले. उपचार सुरू होण्यापूर्वीच बाळासाहेब शिंदे यांना मृत घोषित करण्यात आले.
चौकशीचे आदेश, झालेले मतदान सुरक्षित
घाटनांदूर येथील मतदान पेंद्रांवर हल्ला करून मतदान यंत्र फेकून देण्यात आले. नासधूस करण्यात आली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कडक कारवाई केली जाणार आहे. मतदान यंत्राची तोडपह्ड केल्यानंतर तातडीने दुसरे यंत्र बसवण्यात आले. तत्पूर्वी ज्यांनी मतदान केले आहे त्यांचे मतदान सुरक्षित आहे. त्या मतदानाचीही मोजणी केली जाणार आहे. मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.
पेंद्रप्रमुखाला मारहाण, गंभीर जखमी
केज मतदारसंघातील नेकनूरजवळ असलेल्या आनंदवाडीत येथील एका मतदान पेंद्रावर मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला केंद्रप्रमुखाने ओळखपत्र मागितले आणि त्या कार्यकर्त्याला राग आला. संताप अनावर होत निवडणूक आयोगाचे नियम मी पाळत नसतो म्हणत पेंद्रप्रमुखाला मारहाण केली. त्याच्या मारहाणीमध्ये केंद्रप्रमुखाच्या डोळ्यावर गंभीर इजा झाली. तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी बीडला पाठवण्यात आले. केंद्रप्रमुख उल्हास थिगळे हे सध्या बीडमध्ये उपचार घेत असून नवनाथ देवराव देवगुडे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार देण्यात आली आहे.
बेदरवाडी येथे कमळ आणि तुतारीत तुफान राडा
आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यात असणाऱया बेदरवाडी या छोटय़ाशा गावामध्ये आज मतदानाच्या अंतिम समयी मतदान केंद्रावर विनाकारण चकरा मारणाऱया व्यक्तीला हटकण्याच्या कारणावरून भाजपाच्या सुरेश धस आणि राष्ट्रवादी पवार गटाचे महेबूब शेख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. अर्धा तास हाणामारी सुरू होती. पोलीस पथकाला या घटनेची माहिती कळताच जादा कुमकही घटनास्थळी पाठविण्यात आली. काही वेळामध्ये पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.