बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीच्या कारणावरून करण्यात आलेल्या अमानुष हत्येच्या घटनेतून बीड जिल्हा सावरत नाही तोच शुक्रवारी केवळ डीजेचा आवाज कमी करा, असे सांगितले म्हणून सरपंच आणि त्याच्या टोळक्याने एका महिला वकिलाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. या टोळक्याने काठय़ा, लोखंडी पाइपने शरीर काळेनिळे पडेपर्यंत या महिलेला मारहाण केली.

तालुक्यातील सनगाव येथील अॅड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या अंबाजोगाई सत्र न्यायालयामध्ये वकिली करतात. त्यांना मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे त्यांनी घरासमोर सुरू असलेली पिठाची गिरणी काढण्यात यावी, अशी मागणी करणारी तक्रार प्रशासनाकडे दिली आहे. अॅड. ज्ञानेश्वरी अंजान यांच्या आईचा न्यायालयात सुरू असलेला खटला काढून घेण्यासाठीही त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. काल गावात डीजेचा भयानक आवाज होता. हा आवाज कमी करण्यात यावा, अशी विनंती गुरुवारी अॅड. ज्ञानेश्वरी अंजान यांनी केली.

आवाज कमी करण्याऐवजी सरपंच अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान सपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबूराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे यांनी शेतात नेऊन अॅड. ज्ञानेश्वरी यांना काठय़ा, लोखंडी पाईपने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. अॅड. ज्ञानेश्वरी यांचे काका योगीराज आणि काकू अर्चना यांनाही या टोळक्याने मारहाण केली.

मारहाण करून हे टोळके पसार झाले. मारहाणीमुळे अॅड. ज्ञानेश्वरी यांचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्रीतून त्यांना घरी पाठवण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सोशल मीडियावर मारहाणीचे फोटो व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.