बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली आहे. माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तपास करणार आहे.
पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगोदर विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आठवड्यांनी पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कल्याण येथून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जण सध्या सीआयडीच्या कोठडीत असून, आज त्यांच्यावर ‘मकोका’ लावण्यात आला. फरार कृष्णा आंधळेवरही ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या आंदोलनानंतर वाल्मीक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी बदलण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांच्या पथकातील काही अधिकारी हे वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप झाला. त्यामुळे नव्याने सात जणांची एसआयटी नेमण्यात आली असून तेली हेच पथकाचे प्रमुख आहेत. मात्र आता राज्य सरकारने नवीन न्यायालयीन समिती स्थापन केली आहे.
मकोका का लागला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यावर दहा वर्षांत दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. केज पोलीस ठाण्यात आठ गुन्हे असून, त्यात मारहाणीचे चार, चोरीचा एक तर अपहरणाचा एक, खंडणीचा एक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. महेश केदार याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, 21 वर्षांच्या जयराम चाटेवर तीन गुन्हे दाखल आहेत. प्रतीक घुले याच्यावर पाच गुन्हे असून, फरार कृष्णा आंधळेवर सहा गुन्हे नोंद आहेत.