धनुभाऊंना कोण वाचवतेय! राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींचे धागेदोरे थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यानंतरही धनुभाऊंना वाचवतंय कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांबरोबर सत्ताधाऱयांकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली आहे.

सरपंच हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून पहिल्या दिवसापासून ज्याचे नाव घेतले जात आहे त्या वाल्मीक कराड याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्करली. वाल्मीक कराड याचा करविता धनी मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप बीडमधील विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून केला जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी तर यासंदर्भात तारीखवार माहिती देत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील खंडणीची सगळी चर्चा ही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली होती आणि हे सीडीआर रिपोर्टमध्ये समोर येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणात विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासातून जी काही माहिती पुढे येत आहे त्यावरून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात पुढे काय याबाबत चर्चा केली.

धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जोर धरत असून जिह्याजिह्यात मोर्चे निघत आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाची व्याप्ती आणि धनंजय मुंडे यांचा या प्रकरणातील सहभाग याविषयी अनेक मुद्दय़ांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, धनंजय मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहिले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजीनाम्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एवढे का घाबरतात – संभाजीराजे

वाल्मीक कराड तुमचा जवळचा माणूस असल्याचे मान्य करत असतानाही धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेंमध्ये असे काय आहे, त्याला एवढे घाबरताय, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागते हे दुर्दैव असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

बीडचे राजकीय पर्यावरण बदलेल – पंकजा मुंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून बीडमधील परिस्थिती सुधारतील. त्यानंतर तेथील राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल, असे मंत्री पंकजा मुंडे सरपंच हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना म्हणाल्या. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

…मग मुख्यमंत्री राजीनामा का घेत नाहीत? – सुप्रिया सुळे

देशमुख कुटुंबीयांचे अश्रू आणि भावना पाहून अस्वस्थ व्हायला होते. सरकारने थोडीतरी संवेदनशीलता दाखवायला हवी. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात, मग ते ध्Qानंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, हे त्यांनाच विचारायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुपिऱया सुळे यांनी दिली.

ती स्कॉर्पियो गाडी जप्त

पोलिसांना सद्बुद्धी झाली असून त्यांनी वाल्मीक कराडने पुण्यात शरणागतीला येताना वापरलेली आलिशान स्कॉर्पियो गाडी जप्त केली आहे. हीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मस्साजोग दौऱयातही पाहण्यात आली होती. आमदार सुरेश धस यांनी ही गाडी अद्याप जप्त का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता.

अजितदादांभोवतीचे बदनाम लोक मुंडेंना वाचवताहेत -सुरेश धस

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की त्यांना बिनखात्याचा मंत्री करायचे हा निर्णय सर्वस्वी अजित पवार यांचा आहे. तरीही अजूनही त्यांनी राजीनामा घेतलेला नाही. त्यांच्या भोवताली जे काsंडाळे आहे त्यातील काही लोक धनंजय मुंडेंचे संरक्षण करत आहेत असे मला वाटते. मुंडेंना वाचवणारे लोक हे आधीच बदनाम आहेत. मुन्नी बदनाम हुई तसे अनेक बदनाम अजितदादांबरोबर आहेत, असे सुरेश धस म्हणाले.

आता अजितदादांना राजीनाम्यासाठी पुरावे हवेत? – संजय राऊत

पुरावे समोर आल्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असे अजित पवार यांनी म्हटले असल्याची माहिती आहे. त्यावरून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला पुराव्यांशिवाय जेलमध्ये टाकले गेले तेव्हा अजित पवार बोलले नव्हते. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पुरावा नाही, पुराव्याच्या गोष्टी कसल्या करता? आम्हाला गाडायचे आणि धनंजय मुंडेंसाठी पुरावा शोधायचा, असे संजय राऊत म्हणाले. बीडमध्ये पोलीस आणि राजकारणी यांचे एकत्र बैठकांचे, जेवणाचे पह्टो समोर येताहेत, त्यानंतर आणखी कोणते पुरावे अजितदादांना हवेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

…तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच

आरोप झाले म्हणून तडकाफडकी धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला तर त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतील. महायुती सरकार म्हणून ते परवडणारे नाही, अशी भूमिका महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आहे. सीआयडी, एसआयटी आणि पोलीस यांच्याकडून सुरू असलेल्या तपासाचा एक तरी अहवाल येऊदे. तोपर्यंत ‘वेट अॅण्ड वॉच’ असे धोरण तूर्तास तरी अजित पवार यांनी अंगिकारले आहे.

गँग संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

संतोष देशमुख यांची पत्नी, भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवी यांनी आज आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व पुरावे देत न्यायाची मागणी केली. त्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होईल. गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. एसआयटीमध्ये देशमुख कुटुंबीय सांगेल त्या अधिकाऱयाचा समावेश करू, असेही ते म्हणाले.