
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष, निर्दयी मारहाणीचा व्हिडीओ गुरुवारी विशेष न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची चलअचल संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीने अर्ज केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली. मारहाणीचा व्हिडीओ सार्वजनिक होऊ नये, अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.
अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपये खंडणीत अडसर ठरत असल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कराड गँगने अमानुष मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांचा खास वाल्मीक कराडसह आठ जणांना ‘मकोका’ लावण्यात आला असून या खटल्याची विशेष न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. न्या. व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर आज झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ पुरावा म्हणून सादर केला. त्याचबरोबर इतरही काही पुरावे त्यांनी न्यायालयासमोर ठेवले.
व्हिडीओ अतिशय संवेदनशील असून, तो सार्वजनिक झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ सार्वजनिक होऊ नये, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. आजच्या सुनावणीलाही सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी न्यायालयात झालेल्या प्रक्रियेची माहिती दिली.
वाल्मीक कराडने कितीही अर्ज केले तरी या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे. पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे. त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच बोलतील, असे धनंजय देशमुख म्हणाले.
कराडची चलअचल संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याची चलअचल संपत्ती जप्त करण्याची परवानगी आज सीआयडीने न्यायालयाकडे मागितली. यासंदर्भात ‘मकोका’ कायद्याअंतर्गत स्वतंत्र अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. पुढील सुनावणीत याबाबत युक्तिवाद होईल, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
मी निर्दोष, मला सोडा, वाल्मीक कराडचा अर्ज
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नाही. अवादा कंपनीला आपण खंडणीही मागितली नाही. या संपूर्ण प्रकरणात आपल्याविरुद्ध एकही पुरावा नाही. मी निर्दोष आहे, मला सोडण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज वाल्मीक कराडने आज न्यायालयात सादर केला.
तपास अर्धवट तरीही तपास यंत्रणांनी पाठ थोपटून घेतली
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. हत्या प्रकरणाशी संबंध असलेले पोलीस अधिकारी मोकाट आहेत. हत्या प्रकरणाचा तपासही अर्धवट असतानाच तपास यंत्रणांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. अत्यंत वेगवान तपास केल्याबद्दल तपास यंत्रणेतील 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पुणे येथे अपर पोलीस महासंचालक प्रकाश बुरडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महानिरीक्षक सारंग आवाड, उपमहानिरीक्षक बसवराज तेली, अपर अधीक्षक किरण पाटील, उपाधीक्षक अमोल गवळी, अनिल किसनगुजर, पोलीस सुभाष मुठे, अक्षयकुमार ठिकणे, राजेंद्रकुमार पवार, मृगदीप गायकवाड, नीलेश नागवे, नागसेन सावळे, किरण घोंगडे, सहायक निरीक्षक प्रवीण भोसले, हवालदार योगेश नाईकनवरे, अमोल अंकुशराव बागलाने, शर्मिला साळुंके, दीपाली पवार, शिवाजी कुमावत, कविता शिंदे, सिद्धेश्वर आमटे आदींचा सन्मान करण्यात आला. या सर्वांना रिवॉर्डही दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.