बीड पुन्हा हादरला! प्रेमप्रकरणातून खोलीत डांबून बेदम मारहाण; चटके देऊन तरुणाचा जीव घेतला, धसांच्या तालुक्यातील घटना

प्रेमप्रकरणाचा राग धरून ट्रकचालक तरुणाला दोन दिवस खोलीत डांबून बेदम मारहाण केली. चटके देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पिंपरी घुमरी (ता. आष्टी) येथे घडली. मारहाणीनंतर मालकाने तरुणाच्या आई-वडिलांना फोन करून बोलावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मस्साजोग येथील देशमुख हत्या प्रकरणानंतर या घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे.

मृत विकास बनसोडे हा पिंपरी येथील एका कुटुंबाकडे तीन वर्षांपासून ट्रकचालक म्हणून काम करत होता, पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. बनसोडे हा पिंपरी या गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता. मित्र पळून गेला. मालकाने विकासला पकडून डांबून ठेवत बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. अनैतिक संबंधातून या तरुणाची मालकाकडूनच हत्या करण्यात आली आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता. एका मुलीसोबत विकासचे प्रेमप्रकरण होते. या प्रकरणाची माहिती झाल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते. त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झाला.