
भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, कुख्यात गुंड तथा हरणतस्कर खोक्या उर्फ सतीश भोसले याला एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. राजकीय लागेबांधे असलेल्या या खोक्याला पोलिसांकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. सतीश भोसले याच्या जेवणासाठी सुग्रास बिर्याणी आण्यात आली होती. एवढेच नाही तर तो बिनदास्त फोनवरही बोलत होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोक्या उर्फ सतीश भोसले याला तुरुंगाबाहेर आणण्यात आले होते. यावेळी त्याला जेवणामध्ये बिर्याणी देण्यात आली. नातेवाईकांच्या भेटीगाठीही सुरू होत्या आणि त्याला फोनवर अनलिमिटेड टॉकटाईमही देण्यात आला. वाल्मीक कराडनंतर आणखी एका आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांनी विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
पोलिसांकडून खोक्याभाई उर्फ सतिश भोसलेची राजेशाही बडदास्त, जेवणाला बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम, दोन कर्मचारी निलंबित pic.twitter.com/WNtzN7ggKj
— Saamana Online (@SaamanaOnline) March 25, 2025