
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी दोषारोपपत्रासोबत जोडलेल्या पंधरा व्हिडीओंमधील भयंकर क्रौर्य पाहून प्रत्यक्ष काळही थरारला असेल! वाल्मीक कराड गँग दोन तास संतोष देशमुख यांना लाथाबुक्क्या, रॉड, दांडक्याने अमानूष मारहाण करत होती. या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनीही संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीला अडसर ठरत असल्याने अपहरण करून अमानूष हत्या करण्यात आली. अपहरण करून आरोपींनी संतोष देशमुख यांना आडरानात नेले. तेथे त्यांना दोन तास निर्दयपणे मारहाण करण्यात आली. मारहाण करताना आरोपी एवढे बेभान झाले होते की अर्ध्या तासातच संतोष देशमुख गतप्राण झाले. मारहाण सुरू असतानाच संतोष देशमुख यांनी पाणी मागितले तर एकाने त्यांच्या तोंडात लघवी केली.
आरोपींनी मारहाण सुरू असताना व्हिडीओ कॉल करून आपल्या ‘आका’ला दाखवले. या अमानूष मारहाणीचे पंधरा व्हिडीओ तपास यंत्रणांनी दोषारोपपत्रासोबत जोडले आहेत. पहिला व्हिडीओ दुपारी 3.46 मिनिटांनी तर शेवटचा व्हिडीओ 5.53 मिनिटांनी काढण्यात आला. शेवटच्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख हे निपचित पडल्याचे दिसते. संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह फेकून देत पळ काढला.
कोणत्या व्हिडीओमध्ये काय आहे…
- पहिल्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना वायरने मारहाण करण्यात येत आहे. n दुसऱया व्हिडीओत मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्यात आले.
- तिसऱ्या व्हिडीओमध्येही मारहाण करतानाचे चित्रण आहे.
- चौथ्या व्हिडीओमध्ये महेश केदारने मारहाण केली आहे.
- पाचव्या व्हिडीओत संतोष देशमुख यांना कॉलरला धरून खाली बसवले.
- सहाव्या व्हिडीओत सुदर्शन घुले हाच सर्वांचा बाप आहे असे म्हणायला लावले.
- सातव्या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना बुटाने मारहाण केली आहे.
- आठव्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना पाईपने मारहाण करण्यात आली.
- नवव्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांचे केस ओढून त्यांना बोलायला लावले.
- पंधराव्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख हे निपचित पडल्याचे दिसत आहे.