कोणे एकेकाळी गुंडगिरी, बलात्कार, हिंसाचारासाठी बिहार कुख्यात होते. बिहारची जागा आता महाराष्ट्राच्या बीडने घेतली आहे. बीड जिल्हय़ात गेल्या दहा महिन्यांत 36 खून पडले असून 156 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर दंगलीसारख्या 498 घटनांची नोंद झाली आहे. गावागावात गावठी कट्टे, काडतुसांची रेलचेल आहे. तलवारी, जंबिये, सुरे, रामपुरी चाकू यांची तर मोजदादच नाही. पण सरकार दफ्तरी त्याची नोंदच नाही. दररोज गुन्हे घडतात, मालकांचे पोलिसांना पह्न जातात आणि गुन्हा करणारा मोकाट सोडला जातो… दुसरा गुन्हा करण्यासाठी!
बीड जिल्हा म्हणजे कंकालेश्वराचे देखणे प्राचीन मंदिर, खंडेश्वरीच्या देखण्या दीपमाळा, पाटांगण, नामलगावचा गणपती अशी कितीतरी ठिकाणे सांगता येतील. संपूर्ण महाराष्ट्राला ऊस तोडणीसाठी कामगार पुरवणारा हा जिल्हा. पण गेल्या काही वर्षात बीड जिल्हय़ाची ही ओळख पुसली गेली. जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा वाद होता, परंतु तो केवळ निवडणुकीपुरताच. एकदा निकाल लागला की गावखेडे पुन्हा सुखेनैव एकत्र नांदत असे. आता प्रत्येक गावात जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या. एकमेकांच्या दुकानांवर न जाण्यापासून आता लग्नकार्य, अंत्यविधीपर्यंत हा दुःस्वास येऊन पोहोचला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीडची गुंडगिरी पुन्हा चर्चेत आली. बीडकरांना विचारले तर एवढेच सांगतात, ‘हे काय नवीन नाही, आम्ही असे खून नेहमीच पाहतो. संतोष देशमुखांच्या खुनाची फक्त चर्चा झाली. चित्रपटात दाखवला जाणारे जंगलराज आम्ही दररोज अनुभवतो.’ गुन्हेगारीबद्दलचे एवढे सरावलेपण फक्त बीडमध्येच बघायला मिळते. अगदी खुट्ट वाजले तरी कमरेला लटकावलेला कट्टा बाहेर निघालाच म्हणून समजा.
कायदा फक्त कागदावरच
बीडमध्ये कायद्याचे अस्तित्वच नाही. कायदा येथे फक्त कागदावर आहे. अंमलबजावणी करायची म्हटले की पोलिसांना थरकाप सुटतो. पोलीस अधिकाऱयाला मारहाण करणे, पोलीस ठाण्यात तमाशा करणे हे प्रकार नित्याचेच. त्यामुळे अधिकारीही गुन्हा दाखल करायला धजावत नाहीत. पोलीस शिपायापासून ते अधीक्षकांपर्यंत सर्वांचेच हे हाल. वाढदिवसाला हवेत गोळीबार करणे, मध्यरात्री तोफांचे बार काढणे, मोठमोठे होर्डिंग्ज, बॅनर्स… हे सगळे विनापरवाना. कायदा मोडला तरी ‘आका’ है ना!
खून, बलात्कार, हिंसाचार…
बीड जिल्हय़ाच्या गुन्हेगारीचा आलेख कधीही खाली आलेला नाही. मुलीच्या छेडछाडीवरूनही येथे एकमेकांवर बंदुका ताणल्या जातात. गोळीबाराच्या फैरी उडवल्या जातात. गेल्या दहा महिन्यात बीड जिल्हय़ात तब्बल 36 खून झाले आहेत. 156 बलात्कार आणि 386 विनयभंगाच्या घटना घडल्या असून 498 पेक्षा जास्त हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलाच तर दुसऱयाच क्षणाला त्याचा ‘आका’ फोन करून पोलिसांचे हात बांधून टाकतो. धमकी देणे हा तर सर्वमान्य फंडा. वाळूमाफिया, लाकूड माफिया, मोर माफिया, पाणीमाफिया, जागामाफिया, खंडणीमाफिया… असे कोणतेही क्षेत्र नाही त्यातील माफिया बीडमध्ये आढळणार नाही. दहशत एवढी की आयपीएस अधिकारी चळाचळा कापतात.
‘आका’च्या सांगण्यावरून कराडवरील गुन्हा मागे
लोकसभा निवडणुकीनंतर परळी तालुक्यातील मरलवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी वाल्मीक कराड याने आंदोलन केले होते. त्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी एक गीते नावाच्या आरोपीने वाल्मीक कराड याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यावरून कराडवर गुन्हा नोंदवण्यात आला. पण ‘आका’ची मेहेरबानी झाली आणि गीतेच्या तक्रारीत पोलिसांना काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे गुन्हा मागे घेण्यात आला!
वाल्मीकचे नुसते नाव काढले तरी…
एकवेळ लोक मुंडेना घाबरणार नाहीत पण वाल्मीक कराडचे नुसते नाव काढले तरी घराचे दरवाजे बंद होतात. आता हाच कराड संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात ‘वॉन्टेड’ आहे. संतोष देशमुख यांचे नुकतेच तेरावे झाले. पोलीस अधीक्षक बदलले. अविनाश बारगळ गेले नवनीत कांवत आले. पण हा वाल्मीक कराड काही पोलिसांच्या हाती लागला नाही. कराड पोलिसांना सापडणारच नाही अशी कुजबूजही ऐकायला मिळते. कारण 2022 मध्येच कराडचा गेम वाजणार होता, पण कराडच्या वाढलेल्या ताकदीपुढे ‘आका’ही हतबल झाले अशी चर्चा आहे.
डिघोळे, फड, गर्जे यांचे काय झाले?
बीड, परळीत गुंडगिरीचे थैमान सुरू झाले ते गोपीनाथ मुंडे यांच्याच काळात. कार्यकर्ते पोसायचे आणि डोईजड झाले की त्याला मांजरसुंब्याचा घाट दाखवायचा! संगीत डिघोळे हा असाच एक कार्यकर्ता. माजी आमदार टी. पी. मुंडे यांचा जवळचा नातलग. 2000 मध्ये परळीत किशोर फड मित्रमंडळाचे जोरदार प्रस्थ होते. डिघोळे आणि फड दोघेही चांगले मित्र. पण या मैत्रीत मिठाचा खडा टाकला गेला. कारण डिघोळे हा वरचढ झाला होता. फडने डिघोळेला संपवले. पुढे किशोर फडही डोईजड झाला म्हणून 2008 मध्ये काकासाहेब गर्जेला हाताशी धरून त्याला संपवण्यात आले. गर्जेची चलतीही सात वर्षांचीच. कारण हे सगळे खून सात वर्षांच्या अंतराने आणि घटस्थापनेच्या दिवशीच झाले आहेत. काकासाहेब गर्जेचाही 2015 च्या आसपास खून झाला. तेव्हापासून बीडमध्ये वाल्मीक कराडचे प्रस्थ आहे.