
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई ऊर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील एकाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांचा हा लाडका कार्यकर्ता प्रकाशझोतात आला.
दहशतीपोटी कोणीही तक्रार देण्यास धजावत नसल्यामुळे पोलिसांनीच स्वतः फिर्याद दिली. त्यानंतर या खोक्याभाईवर गुन्हा नोंदवण्यात आला. खोक्याभाई हरीण, काळवीट, ससे, मोरांची शिकार करण्यात पारंगत असल्याचा आरोप वन्य जीवप्रेमींनी केला. आज या खोक्याभाईच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रे, वन्य जीव पकडण्याच्या जाळ्या, वाघूर आदी शिकारीचे साहित्य सापडले. शिकार केलेल्या प्राण्यांचे वाळलेले मांसही आढळून आले.