Beed News – महिन्याभरापासून मुलगी बेपत्ता, शोध घेण्यास पोलिसांचा हलगर्जीपणा, संतापलेल्या आईनं डिझेल अंगावर ओतून घेतलं…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुंडगिरीचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. दररोज बीड जिल्ह्यातून गुंडांकडून सामान्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर येत आहे. यातच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ एक महिला आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पोलीस ठाण्यासमोरच ही महिला अंगावर डिझेल ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेरचा आहे. या महिलेच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. महिन्याभराआधी ही महिला अंबाजोगाई ग्रामिण पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवायला गेली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. अंबाजोगाई ग्रामिण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी महिलेला युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर महिलेने युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र महिना उलटूनही पोलिसांना अद्याप अल्पवयीन मुलीला शोधण्यास यश आलेलं नाही. महिना उलटूनही मुलीचा शोध लागला नाही. यात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने पोलीस ठाण्याबाहेर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. दरम्यान, पोलीस या अल्पवयीन मुलीचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.