
बीडमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावरील मित्राने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मग पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या पालकांना पाठवला. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. सूरज गुंड असे आरोपीचे नाव आहे.
पीडित तरुणी मूळची लातूर येथील असून जानेवारीमध्ये क्लासेससाठी ती बीडमध्ये राहत होती. पीडिता NEET परीक्षेची तयारी करत होती. पीडितेची सूरजसोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांची मैत्री झाली. जानेवारीमध्ये तरुणी लातूरला आपल्या घरी चालली होती. यासाठी ती केज येथे बसची वाट पाहत उभी असतानाच सूरज तेथे आला आणि तिला आपल्या कारमध्ये बसवले.
आरोपी पीडितेला केजपासून 70 किमी दूर रेनापूरमध्ये एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडिओ देखील बनवला. मग तरुणीला लातूरमध्ये सोडून दिले. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीसोबत 10 ते 12 वेळा बलात्कार केला.
कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने तरुणी आरोपीचा अन्याय सहन करत होती. मात्र एक दिवस आरोपीने थेट तरुणीच्या पालकांनाच तिचा व्हिडिओ पाठवला. यानंतर पालकांनी तरुणीकडे विचारणा केली असता तिने सर्व घडला प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी मुलीसह केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.