भाजप आमदार सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; वन विभागाला दिला इशारा

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज रविवारी सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार धस यांना पाहताच भोसले कुटुंबीयांनी आक्रोश केल्याचे दिसून आले. सतीश भोसले याच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच वन विभागानेदेखील कारवाई केली होती.

वन विभागाच्या कारवाईत खोक्याचे घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले, मात्र कोणत्या कायद्यान्वये खोक्याचे घर पाडले, असा सवाल आमदार धस यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ते आज खोक्याच्या घरी भेट देण्यासाठी गेले होते. शिरूर कासार तालुक्यात वृक्ष लागवड शून्य टक्क्यावर आल्याने हे लपवण्यासाठी वन विभागाकडून असे कृत्य करण्यात आल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बुलढाणा जिह्यातील व्यक्ती मारहाणीवरून तक्रार दाखल केली होती, पण याचे घर पाडण्याचे कारण काय? कुणाच्या दबावाखाली केले हेच आम्ही बघत आहोत, असेही धस यांनी म्हटले.