सर्व रिपोर्ट क्लिअर, कराड ठणठणीत, डॉक्टर्सवर कारवाई करा; अंजली दमानिया यांची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) हा पोटदुखीच्या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) दाखल आहे. मात्र कराडचे सर्व रिपोर्ट क्लिअर असून तो ठणठणीत आहे, असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना अंजली अदमानिया म्हणाल्या की, ”रुग्णालयातून कराड याच्या रिपोर्ट्सची मी माहिती घेतली. त्या रिपोर्टमध्ये त्याला काहीही झालेलं नाही, हे सिद्ध झालं आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट व्यवस्थित आहेत. सोनोग्राफीमध्ये त्याला फक्त युरिन इन्फेक्शन असल्याचं समोर आलं आहे. अँटिबायोटिक दिली की, ती व्यक्ती बरी होऊ शकते. यामुळे जितके त्या रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, ”बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते. त्याच्यात मला असं कळलं की, ते राजकीय नेत्यांशी अतिशय जवळीक असलेले व्यक्ती आहेत. त्यांची बीडहून नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती. मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे नाशिकहून परत त्यांची ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली.”