बीड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी दुपारी तीस हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. तर यावेळी कार्यालयात बसलेल्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना जेवता जेवता फरार झाल्याची माहिती आहे.
माजलगाव उपविभागीय कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. जात प्रमाणपत्रासाठी तीस हजार रूपयाची लाच घेतांना त्यांना रंगेहाथ पकडले असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई झाली तेव्हा येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना या आपल्या कार्यालयात जेवण करत होत्या. ही माहिती मिळताच नीलम बाफना जेवण करत असतानाच उठून पळत गेल्या व खाली असलेल्या जीप चालकाच्या मोटारसायकलवर पळून जाण्यास यशस्वी झाल्या असल्याचे या ठिकाणी असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान यापूर्वीचे येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना देखील मध्यस्थामार्फत लाचलुचपत विभागाने वाळू बाबत ६५ हजारांची लाच घेतांना पकडले होते हे विशेष.