
1998 पासून संपादित जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना न दिल्यामुळे बीड जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त करण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने दिले. न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच वाल्मीक कराडच्या कृपेने जिल्हाधिकारी बनलेले अविनाश पाठक यांची धावती गाडी जप्त करण्यात आली.
बीड जिल्हयातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्पासाठी शिवाजी टोगे, संतोष टोगे आणि बाबू मुंडे या तीन शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. जमिनीचा अगदी अत्यल्प मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली. 29 ऑक्टोबर 2015 रोजी न्यायालयाने वाढीव मावेजा 32 लाख रुपये देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाने काही रक्कम अदा केली. उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली.
आदेश देऊनही जिल्हा प्रशासन मावेजा देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून माजलगाव न्यायालयाने कडक भूमिका घेतली. सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुधवंत यांनी मावेजाच्या रकमेला व्याज लावून वसुलीसाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची धावती गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वीच दिले होते.
पैसे देऊ शकत नाही, गाडी घेऊन जा
न्यायालयाचा आदेश घेऊन शेतकऱ्यांचे वकील अॅड. बाबूराव तिडके, अॅड. एस. एस. मुंडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. मावेजाची रक्कम अदा करण्यात यावी अन्यथा गाडी जप्त करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सांगण्यात आले. मात्र पैसे देऊ शकत नाही गाडी घेऊन जा, अशी मुजोरी त्यांनी केली. त्यानंतर बेलिफाने जिल्हाधिकाऱ्यांची एमएच 23 बीसी 2401 या गाडीला सील ठोकले.