आईचे मिंध्यांना पत्र, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून घेत जीवन संपवले! बीडची दुर्दशा थांबेना… छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्याने दररोज नवनव्या घटनांनी जिल्हा हादरून जात आहे. त्यातच छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका मुलीने लग्ग्राच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला महिना उलटल्यानंतर मुलीच्या आईने मिंध्यांना पत्र पाठवून, पत्रात तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाल्याचे दिसत आहे. तपास यंत्रणा झोपेचे सोंग घेत आहे. रोज गंभीर घटना वाढत असताना दुसरीकडे न्यायासाठी टाहो फोडावा लागत आहे. अशीच एक घटना महिनाभरापूर्वी घडली. नेहमीच्याच छेडछाडीला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षी कांबळे या तरुणीने आपल्या मामाच्या घरात म्हणजे धाराशिवमध्ये 14 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही आणि तपासही झाला नाही. त्यामुळे कंटाळलेल्या साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी ‘तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार? असा सवाल करून मुलगी साक्षी तिला हवाईसुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही नराधमांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तुमच्या भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साक्षी आता या जगात परतणार नाही. त्या क्रूर नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हणत साक्षीच्या आईने पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत.

धाराशिवचे पोलीस उपाधीक्षक स्वप्रील राठोड यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिली. आरोपींच्या मोबाईलमध्ये चॅटिंग अद्यापही उघड करण्यात आलेले नाही. आरोपीची बहीणही यात सहआरोपी आहे. मात्र त्या पोलीस दलामध्ये असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा संशय साक्षीच्या आईने व्यक्त केला.
एकीकडे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र रोज लाडक्या बहिणीवर अत्याचार होत आहेत. त्यांना न्याय मिळत नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे.