माजलगावात कोयत्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या, बीड जिह्यात पुन्हा थरार…

बीड जिह्यातील खूनखराबा थांबता थांबण्याचे नाव घेत नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने जिल्हा ढवळून निघाला असतानाच आज मंगळवारी माजलगावात भाजपचा लोकसभा विस्तारक तथा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक बाबासाहेब प्रभाकर आगे (30) याची एका तरुणाने कोयत्याचे सपासप वार करून हत्या केली. या घटनेनंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची चर्चा होत असून, कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधडय़ा उडविणाऱया या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीड जिल्हा हादरला आहे.

स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर भाजपचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे हा उभा होता. त्यावेळी बेलुरा येथील नारायण शंकर फपाळ हा तेथे आला व त्याने बाबासाहेब आगेवर कोयत्याने सपासप वार केले. कोयत्याचे घाव वर्मी लागताच आगे खाली कोसळून गतप्राण झाला.

या थरारक घटनेनंतर नारायण फपाळ पोलीस ठाण्यात हजर झाला. नारायणच्या पत्नीशी बाबासाहेब याचे लग्नाच्या पूर्वीपासून संबंध होते. त्यास सांगूनही आगे ऐकत नव्हता. त्यामुळेच त्याचा काटा काढल्याची कबुली नारायणने दिली आहे. आज सकाळी एका जमिनीचा वाद मिटवण्यासाठी बाबासाहेब आगे आरोपीच्या बेलुरा या गावी गेला होता. तेथे त्याची व नारायणची खडाजंगी झाली. त्यानंतर नारायण आगे याच्या पाठोपाठ माजलगाव शहरात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपी नारायण फपाळ याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून आगे याची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली.