एकाच व्यक्तीच्या खात्यातून 900 कोटींचा व्यवहार, सुरेश धस यांचा सर्जिकल स्ट्राइक

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पुन्हा जोरदार सर्जिकल स्ट्राइक केला. वादग्रस्त महादेव अॅपच्या माध्यमातून ‘आका’ने एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल 900 कोटींचा व्यवहार केल्याचा बॉम्बगोळा धस यांनी टाकताच बीडकरांचे डोळेच पांढरे झाले. हा व्यवहार दडपण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांना लाथा घालून जिल्हय़ाबाहेर हाकलले आणि तळवे चाटणारे अधिकारी जिल्हय़ात आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन त्यांना महादेव अॅप व्यवहारासंदर्भात चौकशीचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळून जोरदार बॅटिंग केली. महादेव अॅपच्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील टेंभुर्णी येथील एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चांगले अधिकारी नेमण्यात आले होते. मात्र वेगवेगळी लांच्छने लावून या अधिकाऱयांना जिल्हय़ाबाहेर हाकलण्यात आले.

हे बघा ‘आका’चे उद्योग

बीड जिह्यात बिंदुनामावलीचा आधार न घेता पोलिसांच्या नेमणुका करण्यात आल्या. यात ‘आका’च्या खिशात किती मलिदा गेला? ‘आकाने’ मांजरसुंब्याजवळ पन्नास एकर जमीन घेतली. शेतकऱयांच्या शेतातून माती उचलली. गरीब शेतकऱयांवर गुंडांकडून धमक्या दिल्या गेल्या. माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथेही जमीन घेतली गेली. सिरसाळय़ातील गायरान जमिनीवर अतिक्रमण केले. ‘आकाच्या’ हस्तकांनी या गायरान जमिनीवर 300 वीटभट्टय़ा उभ्या केल्या.

‘आका’च्या जमिनीत 40 कोटींचा बंधारा

परळीत आनंद चॅरिटेबलसाठी अडीच हेक्टर जागा सरकारने दिली होती. तेथे रुग्णालय आणि वृद्धाश्रम उभारायचे होते. मात्र या ट्रस्टचे अध्यक्ष ‘आकाला’ व्हायचे होते म्हणून ‘आकाने’ ते कामच होऊ दिले नाही. परळीत राख माफिया कुणाचे आहेत? थर्मलमधून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत राख उचलली जाते. राखेच्या प्रत्येक गाडीवर ‘आकाला’ जिझिया कर द्यावा लागतो.

वाल्मीक कराडला राजाश्रय! – प्रकाश सोळंके

खून, अपहरण, खंडण्या मागणाऱयांना, दहशत माजवणाऱयांना पकडले जात नाही. हे बीड जिह्यासाठी अत्यंत दुर्दैवाचे आहे. 18 दिवस होऊन गेले तरी संतोष देशमुखांचे मारेकरी हाती लागत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात कोणाचीही गय करणार नसल्याचे म्हटले होते. मग वाल्मीक कराड का सापडत नाही, त्याला राजाश्रय आहे म्हणूनच! असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. खून, अपहरण, खंडण्या, दहशत माजवणे, गोळीबार करणे असे राजकीय हस्तक्षेपाशिवाय घडूच शकत नाही. गुन्हेगारांना बीड जिह्यात भीतीच राहिली नाही. आपल्यामागे कोणीतरी ठाम उभा आहे. या मानसिकतेतूनच गुंडांचे राज्य बीडमध्ये निर्माण झाले आहे, असे सोळंके म्हणाले.

ईडी काय काळझोपेत आहे का?

कुठे घोटाळा झाला की ईडीचे कान टवकारतात. इथे 900 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे हे धडधडीत दिसत असूनही ईडीने चक्क डोळे झाकून घेतले आहेत. ‘ईडी’लाही या ‘आका’ने मॅनेज केल्याचे स्पष्ट दिसत आहे. बदलून आलेल्या अधिकाऱयांनी महादेव अॅप घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी खटाटोप केला. या घोटाळय़ाची पाळेमुळे थेट मलेशियापर्यंत पोहोचली आहेत. तरीही ईडी चौकशी करत नसल्याबद्दल धस यांनी आश्चर्य व्यक्त केले.

धाराशीवमध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला

पवनचक्कीच्या वादातून बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे वादळ अजून घोंगावत असतानाच धाराशीवमध्ये मेसाई जवळगाच्या सरपंचावर याच वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंच आणि त्यांचा भाऊ जखमी झाला. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला अठरा दिवस उलटून गेले, मात्र या कटाचा मास्टरमाईंड अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. देशमुख हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.