बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये डील; पीएसआयंनतर हवालदार, चालकही निलंबित

परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचे निलंबन झाले होते. आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

सायबर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता. त्यात एक आरोपी अटक केला. त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. परंतु, याच पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजित कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने या आरोपीला खासगी वाहनातून घेऊन गुजरात राज्यात गेले. त्या आधी त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते. तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबित करण्यात आले.

आरोपी गुजरातमध्ये
कासले यांच्यासह गिरी, भाग्यवंत यांनी शासकीयऐवजी खासगी वाहन गुजरातमध्ये नेले. भाग्यवंत हे सुट्टीवर होते. तसेच, सायबर पोलीस ठाण्यात वाहन नसतानाही त्यांची पोस्टिंग तेथेच होती. तर, गिरी हेदेखील एका ठिकाणी युनिफॉर्मवर बैठकीत बसल्याचे दिसले. हे सर्व पुरावे पाहून आणि चौकशीतील मुद्द्यांवरून काँवत यांनी गिरी व भाग्यवंत यांनाही निलंबित केले.

व्याजाची सहा लाख रक्कम घेऊन वसुली अधिकारी फरार
अंबाजोगाई येथील 54 महिलांनी बचत गटासाठी कर्ज घेतले होते. त्याचे ६ लाख ३९ हजार ८७५ व्याज महिलांनी वसुली अधिकाऱ्याकडे भरले होते. परंतु, त्याने फायनान्सला न भरता रकमेचा अपहार करीत फायनान्सची फसवणूक केली. या प्रकरणी वसुली अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील महिलांच्या विविध बचत गटांन भारत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड शाखा अंबाजोगाईच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२३ ते २२ जुलै २०२४ या कालावधीत कर्ज वाटप करण्यात आले होते. घेतलेल्या कर्जाचे व्याज परतावा म्हणून ५४ महिला बचत गटांनी ६ लाख ३९ हजार ८७५ रुपयांची रक्कम भारत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड शाखा अंबाजोगाईचे वसुली अधिकारी कार्तिक परमेश्वर पुंड (रा. घनसांगवी फाटा, सावतानगर अंबड, जि. जालना) यांच्याकडे जमा केली होती. जमा झालेली ही रक्कम वसुली अधिकरी पुंड यांनी फायनान्समध्ये न भरता आपल्याकडे ठेवून रकमेचा अपहार केला. या प्रकरणी फायनान्सचे मुख्य अधिकारी इम्रान इस्माईल सय्यद (रा. माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून वसुली अधिकारी कार्तिक परमेश्वर पुंड यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.