बीडमध्ये खुनाचा सिलसिला कायम, अज्ञातांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करून ठार केले

बीड जिल्हय़ात खुनाचा सिलसिला कायम असून, अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडला जाणाऱ्या रस्त्यावर सारडानगरीजवळ दोन अज्ञात तरुणांनी तीसवर्षीय तरुण राजकुमार साहेबराव करडे यास कोयत्यासारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून ठार केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून, हा प्रकार कशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणेला सपशेल अपयश येत असून, पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज 1 एप्रिल रोजी  सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई शहरातून पोखरीला जाणाऱ्या रस्त्यावर अगदी हाकेच्या अंतरावर सारडा नगरीजवळ राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोन अनोळखी तरुणांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर, पाठीवर सपासप वार करून निर्दयीपणे गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत या तरुणाला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना कशामुळे घडली, कोणत्या कारणाने हल्ला करण्यात आला हे अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या तपासांती उघडकीस येईल.