
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर बीडमधील गुन्हेगारी जगासमोर आली. त्यामुळ बीडची तुलना एकेकाळी गुंडगिरी, बलात्कार आणि हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहारशी केली जाऊ लागली. अशातच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
गिरणी आणि लाऊड स्पीकरच्या आवाजाची तक्रार केली म्हणून सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सेनगावातील सरपंचासह दहा जणांनी बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांडका आणि रबरी पाईपने केलेल्या मारहाणीमुळे पीडितेच्या अंगावर काळेनिळे वळ उठले आहेत. याचा खळबळजनक फोटो व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव येथील अॅड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात. गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊडस्पीकर लावू नये, तसेच घरासमोरील पिठाच्या गिरण्या काढाव्या यासाठी तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून गावच्या सरपंचाच्या मनात होता. ज्ञानेश्वरी या आमराईत कैऱ्या आणण्यासाठी जात असताना सरपंचासह आठ ते दहा जणांना त्यांना घेरले आणि रबरी पाईप, लाकडी दांडका आणि फायटरने पाठ, मान, पोटऱ्यांवर मारहाण केली. तसेच यापुढे आमच्याविरुद्ध तक्रार दिली तर खल्लास करून टाकू असे म्हणत अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली.
दरम्यान, या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्थानकात रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडु मोरे (सर्व रा. सेनगाव ता. अंबाजोगाई जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.