
शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांच्या पाठपुराव्यामुळे वांद्रे पूर्व गौतमनगर समता सेवा संघमधील रहिवाशांना वांद्रे पूर्व परिसरातच हक्काचे घर मिळाले आहे. रहिवाशांच्या या प्रश्नासाठी आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे याकडे लक्ष वेधले होते.
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीनंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभा क्षेत्रामधील प्रत्येक सोसायटीला भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता ‘आमदार आपल्या दारी’ हा अनोखा कार्यक्रम हाती घेतला होता. यामध्ये 7 फेब्रुवारी रोजी वांद्रे पूर्व परिसरातील गौतमनगर, समता सेवा संघाच्या रहिवाशांनी सरदेसाई यांची भेट घेऊन ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत उच्च न्यायालयाच्या इमारतीकरिता भूखंड आरक्षित केल्याने रहिवाशांचे राहत्या घरांचे निष्कासन करण्याबाबत नोटीस प्राप्त झाल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला. या रहिवाशांना जबरदस्तीने मालाड, आप्पापाडा या ठिकाणी स्थलांतरित होण्याकरिता घरांची लॉटरी सोडत काढली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गौतमनगर समता सेवा संघाच्या रहिवाशांना वांद्रे परिसर सोडून मालाड या ठिकाणी स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे या सर्व रहिवाशांनी आमदार सरदेसाई यांच्याकडे वांद्रे परिसरातच घरे मिळवून देण्याबाबत विनंती केली होती.
रहिवाशांकडून शिवसेनेचे आभार
शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांच्या पाठपुराव्यामुळे 26 मार्च रोजी या घरांची लॉटरी सोडत काढून या सर्व रहिवाशांना वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी येथील ओम साई सी.एच.एस. एसआरएच्या इमारतीमध्ये हक्काची घरे मिळाली. यावेळी शिवसेना पदाधिकारी अरुण कांबळे, अनिल त्रिंबककर, रोहिणी कांबळे, जय सरपोतदार, हरी शास्त्राr, शशिकांत येल्लमकर, सुरेश होलगुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आपली हक्काची घरे मिळवून दिल्यानंतर गौतमनगर समता सेवा संघाचे रहिवासी राकेश ढिल्लोड, राजन मोरे, दीपाली येवले, प्रवीण सागवेकर, अविनाश पवार, इस्माईल कुरेशी यांच्यासह सर्व रहिवाशांनी आमदार वरुण सरदेसाई यांचे आभार मानले.