![tea](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/tea-696x447.jpg)
महाकुंभमेळ्यात जगभरातील भाविक येत आहेत. आजवर या मेळ्याला कोटय़वधी भाविकांनी भेट देऊन पवित्र स्नान केले. कुंभमेळ्याच्या गर्दीत चहा विकून किती पैसे कमावू शकता, याचा काही अंदाज आहे का? हेच जाणून घेण्यासाठी एका कंटेंट क्रिएटरने अलीकडेच कुंभमेळ्याच्या परिसरात चहाचा स्टॉल चालवण्याचे आव्हान स्वीकारले. चहा विकून किती कमाई केली, याचा आकडाही सांगितला. तो ऐकून भलेभले थक्क झाले आहेत.
कंटेंट क्रिएटर शुभम प्रजापतीने इंस्टाग्रामवर त्याचा अनुभव शेअर करताना व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये तो लोकांना 10 रुपयांचा चहा देताना दिसतोय. महाकुंभमेळ्यात चहाने भरलेला एक मोठा डबा आणि डिस्पोजेबल कप घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा देत फिरतो. दुपारी 2 वाजेपर्यंत मागणी कमी झाली. पण संध्याकाळी चहाची मागणी चांगलीच वाढली. दिवसाच्या शेवटी त्याने 7 हजार रुपये कमावले. यामध्ये त्याला 5 हजार रुपयांचा चांगला नफा झाला.’ सध्या देशात बेरोजगारी प्रचंड वाढली असून अनेक तरुण व्यवसाय करण्यासाठी धजावत नाहीत, अशा तरुणांसाठी या चहावाल्याची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून उमटल्या आहेत.
जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात लाखो लोक उपस्थित असल्याने, अन्न आणि पेय पदार्थांची मागणी जास्त आहे.
प्रजापतीने आपली कमाई व्हिडीओतून सांगितल्यावर त्याच्या उद्यमशीलतेचे अनेक जण काwतुक करत आहेत. काही जणांनी लगेच त्याच्या कमाईची आकडेमोड करून तो महिन्याला किती कमावतो, याचे गणित मांडले. प्रजापती जर दिवसाला 5 हजार रुपये कमावत असेल तर 30 दिवसांत तो 1 लाख 50 हजार रुपये कमावतो.