देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अवघ्या वर्षभरात तब्बल 12 हजार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक सायबर चोरांनी केली असून मुंबईसह पुणे आणि अन्य शहरांत अशी एकूण 38 हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, 2024 मध्ये महाराष्ट्रात सायबर चोरीच्या 2 लाख 19 हजार 47 घटना उघडकीस आल्या आहेत. यातील 38 हजार 872 कोटी रुपयांचा फ्रॉड झालाय. मुंबईतील फ्रॉडची संख्या सर्वात जास्त असून ही संख्या 51,873 आहे. यातून एकूण 12,404.12 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.
मुंबईनंतर पुणे
मुंबईनंतर पुणे शहरातही सर्वात जास्त सायबर चोरांनी पैशांवर
डल्ला मारला आहे. पुण्यात 22,059 फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेतून जवळपास 5,122.66 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पुण्यानंतर ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूरसह अन्य काही जिह्यांचा समावेश आहे.
नागपूरही असुरक्षित
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहरसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. या ठिकाणी सायबर चोरीच्या 11,875 घटनांची नोंद करण्यात आली आहे. फडणवीस हे गृहमंत्री असूनही त्यांना या घटना कमी करण्यात सपशेल अपयश आले आहे. सायबर चोर हे वेगवेगळे फंडे वापरून सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई एक मिनिटात चोरून नेत आहेत.