केंद्रीय करारात रोहित, विराट, जाडेजाची गच्छंती? श्रेयस अय्यर, इशान किशन यांचे पुनरागमन होणार

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) लवकरच पुरुष क्रिकेट संघाच्या केंद्रीय कराराची घोषणा होणार आहे. यंदाच्या करारात रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जाडेजा या स्टार खेळाडूंची ‘ए प्लस’ ग्रेडमधून गच्छंती होण्याची शक्यता आहे. याचबरोबर श्रेयस अय्यर व इशान किशान हे क्रिकेटर ‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारात पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित आहे.

खेळाडूंच्या पेंद्रीय कराराच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ची उद्या (दि. 29) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र, ‘बीसीसीआय’कडून पेंद्रीय कराराची घोषणा होण्यापूर्वीच एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांची करारात गच्छंती होणार असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय, पहिल्यांदाच काही नवीन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीचे प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची गुवाहाटी येथे शनिवारी (दि. 29) बैठक होणार आहे. जूनमध्ये होणाऱया इंग्लंड दौऱयासाठी टीम इंडियाच्या संभाव्य निवडीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत पुरुष संघाच्या पेंद्रीय करारालाही अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

का होणार स्टार खेळाडूंची गच्छंती?

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा हे स्टार खेळाडू ‘बीसीसीआय’च्या पेंद्रीय करारात ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये आहेत. ही श्रेणी सर्वसाधारणपणे सर्व फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंसाठी राखीव आहे. मात्र, रोहित, कोहली आणि जाडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना ‘ए प्लस’ ग्रेडमधून ‘ए’ ग्रेडमध्ये खाली आणले जाण्याची शक्यता आहे. मात्र, टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये कायम राहू शकतो. त्याच्या जोडीला या सर्वोच्च श्रेणीत आणखी कोणाची वर्णी लागते याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलला ‘ए’ ग्रेडमधून ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये बढती मिळू शकते. यशस्वी जैस्वाल ‘बी’ ग्रेडमधून ‘ए’ ग्रेडमध्ये जाऊ शकतो. अष्टपैलू अक्षर पटेलचीही ‘बी’ ग्रेडमधून ‘ए’ ग्रेडमध्ये वर्षी लागू शकते.