‘देव’ पावला..! कॅन्सरग्रस्त अंशुमन गायकवाड यांना BCCI कडून 1 कोटींची मदत

कॅन्सरशी झुंज देणारे टीम इंडियाचे माजी खेळाडू आण माजी कोच अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयने 1 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत सूचना दिल्या आहे. जय शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आर्थिक मदतीची घोषणा केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

संकटाच्या काळात बीसीसीआय अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. गायकवाड बरे व्हावेत यासाठी जे काही आवश्यक आहे ते बीसीसीआय करेन. त्यांच्या प्रकृतीवर बीसीसीआयचे लक्ष असून ते यातून निश्चितच बाहेर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि माजी कोच अंशुमन गायकवाड (वय – 71) यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर सध्या गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची अशी अवस्था बघून टीम इंडियाचे खेळाडू आणि वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव अस्वस्थ झाले.

‘ब्लड कॅन्सर’शी झुंजणाऱ्या दिग्गज खेळाडूची अवस्था पाहून कपिल देव अस्वस्थ; पेन्शन दान करण्याची तयारी, BCCI ला केली विनंती

कपिल देव यांनी बीसीसीआयला मदतीची गळ घातली होती. एवढेच नाही तर गायकवाड यांच्या उपचारासाठी कपिल देव यांनी आपली पेन्शनही देऊ केली.कपिल देव यांच्या आवाहनानंतर बीसीसीआयने तात्काळ अॅक्शन घेतली असून कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अंशुमन गायकवाड यांना 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात टीम इंडियाकडून 40 कसोटी आणि 15 एक दिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर 2 शतक आणि 10 अर्धशतकांसह 1985 आणि वन डेमध्ये 269 धावांची नोंद आहे. निवृत्तीनंतर त्यांनी दोन वेगवेगळ्या कालखंडात टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले.