दोन दिवसांपूर्वी शुबमन गिल आणि आवेश खान यांना टी-20 वर्ल्ड कप संघातून मुक्त करताना मायदेशी पाठवण्यात आले होते. तेव्हा या दोघांवर बीसीसीआयने बेशिस्त वर्तणुकीसाठी दंडात्मक कारवाई करत माघारी पाठवल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आज याबाबत खुद्द गिलनेच अधिक प्रकाश टाकताना मी आणि समायरा (रोहितची कन्या) कर्णधार शर्माकडून शिस्तीचे धडे शिकत असल्याची पोस्ट टाकून आपल्याबद्दल सुरू असलेले वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी शुबमन गिलची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याला तडकाफडकी मायदेशी पाठवल्याचे वृत्त समोर येताच तो स्पर्धेदरम्यान आपली खासगी कामे करत असल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बेशिस्त वर्तणुकीसाठी दंडात्मक कारवाई केल्याची बोलले जात होते. मात्र गिलने इन्स्टावर रोहितबरोबरचा पह्टो शेअर करत हे आपल्यावर कारवाईचे वृत्त निरर्थक असल्याचे स्पष्ट केले आहे.