रोहित, विराट, जाडेजा ग्रेडमध्ये अव्वलच, बीसीसीआयने 64 खेळाडूंशी केला केंद्रीय करार; श्रेयस-ईशानचे पुनरागमन, तर अश्विनसह पाच खेळाडू बाहेर

‘टीम इंडिया’च्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ‘रन’मशिन विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तरीही ‘बीसीसीआय’ने या तिघांसह प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये कायम ठेवले आहे. याचबरोबर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचे ‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी दोघांनाही ‘बीसीसीआय’च्या (2023-24) केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते.

गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिघांनीही टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. या तिघांना ‘ए प्लस’ ग्रेडमधून बाहेर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ‘बीसीसीआय’ने या महान खेळाडूंना सर्वोच्च श्रेणीत ठेवून त्यांचा बहुमान कायम ठेवला आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य न दिल्याबद्दल बोर्डाच्या आदेशानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना गेल्या वर्षी केंद्रीय करारातून वगळले होते.

जर एखाद्या खेळाडूचा राष्ट्रीय संघात समावेश नसेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा ‘बीसीसीआय’चा आदेश आहे. मात्र, श्रेयस अय्यर आणि इशान किशन त्यावेळी उर्वरित रणजी ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यानंतरच या दोघांचे ‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारात पुनरागमन झाले आहे.

अभिषेक, नितीश, हर्षित, वरुण प्रथमच बीसीसीआय करारात

अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती या चार क्रिकेटपटूंचा प्रथमच बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आला आहे. या चौघांनाही ‘क’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. वरुणने 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 9 बळी टिपले होते. नितीशने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांना प्रभावित केले होते. याचबरोबर अभिषेक शर्माने 2024-25 मध्ये खेळलेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200.48च्या स्ट्राइक रेटने 411 धावांची लयलूट केली होती.

शार्दुलअश्विनसह 5 खेळाडू बाहेर

‘बीसीसीआय’च्या नव्या केंद्रीय करारात मागील वर्षीच्या केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या 5 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यात शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जितेश शर्मा, के. एस. भरत आणि आवेश खान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावपार ट्रॉफीदरम्यान अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

केंद्रीय करारात 34 खेळाडूंचा समावेश

‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 30 खेळाडूंशी केंद्रीय करार देण्यात आला होता. ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच केवळ चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ‘ए’ ग्रेडमध्ये 6 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वेळीदेखील या श्रेणीत इतकेच खेळाडू होते. ‘बी’ ग्रेडमध्ये गेल्या वेळीप्रमाणे पाच खेळाडू आहेत, तर ‘सी’ ग्रेडमध्ये 19 खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या वेळी या ग्रेडमध्ये 15 खेळाडूंना स्थान देण्यात आले होते.

कोणत्या ग्रेडसाठी किती पैसे

‘बीसीसीआय’च्या केंद्रीय कराराच्या ‘ए प्लस’ ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि ‘सी’ ग्रेडमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये देण्यात येतात.

केंद्रीय करारातील क्रिकेटपटूंची यादी

प्लसग्रेड      रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा.

ग्रेड       मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंडय़ा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.

बीग्रेड      सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर.

सीग्रेड    रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे, रवि बिश्नोई, ऋतुराज  गायकवाड, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, इशान किशन, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.