
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत संघाची झालेली खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील माहिती बाहेर पसरवल्याच्या कथित प्रकरणानंतर बीसीसीआयने टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय संघाबरोबरचा तीन वर्षांचा करार संपल्याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि स्ट्रेथ अॅण्ड पंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही काढून टाकण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईट वॉश पत्करावा लागल्यानंतर हिंदुस्थानच्या कसोटी सामन्यातील प्रदर्शनाला घरघर लागली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूसी) दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येदेखील हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून 3-1 असा निराशाजनक पराभव पत्करावा लागल्याने डब्ल्यूसीच्या आशा मावळल्या होता. मेलबर्न कसोटी संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चौथ्या कसोटीतील खेळाडूंच्या कामगिरीवर फारसे खूश नव्हते आणि त्यांनी खेळाडूंना हे सांगितले. सिडनी कसोटी सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरने या वृत्तांवरील आपले मौन सोडले आणि ड्रेसिंग रूममध्ये काही चर्चा झाल्याचे सांगितले.
बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, अभिषेक नायर आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डॉशेट यांच्यावर 2025 च्या सुरुवातीलाच चौकशी सुरू होती. आठ महिन्यांपूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यात अभिषेक नायर आणि माजी नेदरलॅण्ड्स क्रिकेटपटू रायन टेन डॉशेट हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून हिंदुस्थानच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाले. नायर आणि डॉशेट हे केकेआरमध्ये सहाय्यक प्रशिक्षक होते आणि त्यांनी गंभीरसोबत काम केले.
ड्रेसिंग रूममधील खबरी
मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी पराभवानंतर गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना कडक शब्दांत सुनावले. त्यांनी खेळाडूंना परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी नैसर्गिक खेळावर अवलंबून राहिल्याबद्दल फटकारले. या ड्रेसिंग रूममधील संभाषणाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे गंभीर नाराज झाला होता. सिडनी कसोटीपूर्वी त्याने ती नाराजी व्यक्तही केली होती. नंतर त्यांनी बीसीसीआयच्या बैठकीत सर्फराज खानवर खबरी असण्याचा आरोप केला होता, पण आता रोख दुसरीकडेच जातोय.