Champions Trophy मध्ये दमदार कामगिरी करा अन्यथा…; BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय

टीम इंडियाचे गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर दिलेला वाईटव्हॉश त्यानंतर 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर करंडक गमावला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC) पोहोचण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे BCCI खडबडून जागी झाली असून कर्णधार रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रोहित आणि विराटच्या भविष्या संदर्भात चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीचा टीम इंडियाला जोरदार फटका बसला आहे. खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका सुद्दा झाली. तसेच टीम इंडियाचे प्रदर्शनही मागील काही महिन्यांपासून अत्यंत खराब राहिले आहे. त्यामुळे BCCI ने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थिती मुंबईमध्ये 11 जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली होती. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये टीम इंडियाची वर्तमान कामगिरी आणि भविष्यात कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे यावर चर्चा झाली.

बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता सध्या काहीही होणार नाही, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधारपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जर टीम इंडियाचे प्रदर्शन आहे तसेच राहिले तर कर्णधारा पदाबाबात हालचाल होऊ शकते. त्याच बरोबर विराट कोहलीने सुद्दा धावा करने गरजेचे असल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणने आहे. परंतु दोघांनाही कसोटीमधून वगळण्याचा सध्या विचार नाही. सर्व काही चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून आहे. तसेच खेळाडू द्विपक्षीय मालिका आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होत नसल्याने संघ व्यवस्थापन नाराज आहे, त्यामुळे जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणार नाहीत. अशा खेळाडूंची निवड करण्यात येणार नाही, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.