हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का नाही यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना BCCI ने पुर्णविराम लावला आहे. हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तशी माहिती बीससीआयने ICC ला दिली आहे.
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे की, केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आता ‘हायब्रिड मॉडेलवर’ खेळवली जाऊ शकते. याबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेला नाही. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी हायब्रिड मॉडेल संदर्भात चर्चा करण्यास यापूर्वीच सहमती दर्शवली आहे.
ICC Champions Trophy 2025 चा रणसंग्राम 19 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आठ संघांमध्ये द्वंद्व रंगणार आहे. हिंदुस्थानसह, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाचा समावेश असून दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात येणार आहे.