शमीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा संपला, कसोटी संघात निवड होण्याची शक्यता मावळली

गेले महिनाभर हिंदुस्थानी क्रिकेट संघ ज्या मोहम्मद शमीची आतुरतेने वाट पाहात होता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार नसल्याचे खुद्द बीसीसीआयनेच स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटींसाठी तो पूर्णपणे फिट नसल्याचे कारण देत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून लांबच ठेवले जाणार आहे. त्याच्या गुडघ्याला सूज आल्यामुळे तो सध्या कसोटी क्रिकेटसाठी पूर्णपणे फिट नसल्याचे मत एनसीएने वर्तवले आहे. गेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर शमीच्या टाचेवर झालेल्या शस्त्रक्रियेपासून तो वर्षभर संघाबाहेरच आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो संघात पुनरागमन करील अशी सर्वांना आशा होती. यासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्यासही प्रारंभ केला होता आणि त्याच्या दुखापतीत खूप सुधारणा झाल्याचेही दिसत होते, मात्र त्याचा फिटनेस कसोटी क्रिकेटला साजेसा नसल्यामुळे त्याच्याकडून अधिकाधिक सराव करून घेतला जात होता. एनसीएचे एक विशेष पथक शमीच्या फिटनेसवर लक्ष ठेवून होते. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार होता. खुद्द रोहित शर्मानेच याची माहिती दिली होती.

गेल्या आठवड्यात रोहितने पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिलेल्या माहितीवरूनच शमीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा कठीण असल्याचे संकेत मिळाले होते. तरीही तो किमान सिडनी कसोटीसाठी तरी संघात असेल, असे मानले जात होते. मात्र आज बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट नसल्याचे सांगत शमीच्या ऑस्ट्रेलियात खेळण्याच्या आशांना पूर्णविराम दिला आहे. मात्र तो आगामी वन डे मालिकेत खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचेही सैकिया म्हणाले.